नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे.
लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना गुरुवारपासून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर ४ ते ६ मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभाही होण्याची शक्यता आहे. स्टार प्रचारकांसह हजारो कार्यकर्ते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदाेबस्ताची आखणी करत आहे.
वाहतूक बदलासह सशस्त्र बंदोबस्त
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या मार्गांवर गर्दी राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयाच्या दाेन्ही प्रवेशद्वारांवर सरकारवाडा पाेलिसांसह गुन्हे शाखा व एसआरपीएफ, हाेमगार्डचा बंदाेबस्त तैनात असेल. कार्यालयातही बंदाेबस्त तैनात राहणार असून, सशस्त्र पोलिसही असतील.
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त बंदाेबस्तासह बॅरिकेडिंग असतील. तसेच एसआरपीएफ, सीआयएसएफ, साध्या वेशातील पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात असेल. – किरणकुमार चव्हाण, पाेलिस उपायुक्त, परिमंडळ एक.
हेही वाचा: