लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

इच्छुक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच कायम असताना शिवसेना व भाजप पक्षांतर्गत इच्छुकांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील फाटाफूट तूर्तास टळली आहे.

महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित करून आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महायुतीमधील जागांचा गुंता काही केल्या सुटण्याचे चिन्ह दिसत नाही. काही मोजक्या जागांवरून युतीचे जागावाटप अडले असून, त्यात नाशिक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. युतीत राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा सोडताना मंत्री छगन भुजबळ यांनाच तिकीट दिले जाईल, असे बोलले जात आहे. पण, अद्याप त्याची अधिकृत घोषणा बाकी असताना महायुतीमधील इच्छुक आतापासून निवडणुकीपासून दूर गेले आहेत. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संसद खुणावत होती. त्याअनुषंगाने गोडसेंनी तयारी सुरू करताना मुंबईत तिकिटासाठी शक्तिप्रदर्शन केले. पण, अखेरच्या टप्प्यात आपला पत्ता कट होतोय याची खात्री झाल्याने गोडसे यांनी एकाएकी हाराकिरी पत्करल्याचे चित्र आहे. एवढचे काय तर पक्षादेश शिरसंवाद्य मानत महायुती देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. त्यामुळे गेली दोन टर्म ज्यांच्यासोबत लढाई केली त्या भुजबळांसाठी गोडसे प्रचाराच्या रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. गोडसे यांच्याप्रमाणे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनीही नरमाईची भूमिका घेतल्याचे जाणवते आहे.

भाजपकडून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी सिंहगर्जना करणाऱ्या पाटील यांची भाषा सध्या बदलली आहे. उमेदवारीवर आजही दावा कायम असल्याचे सांगणाऱ्या पाटील यांच्या विरोधाची धार कमी झाली आहे. मविप्रच्या माध्यमातून लोकसभेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ॲड. ठाकरे यांनी उमेदवारीसाठी महायुती व महाआघाडीची दारे झिजवली. पण, हाती अपयश आल्याने ठाकरेंची परिस्थिती सध्या विजनवासात गेल्यासारखी झाली आहे. एकूणच निवडणुकांपूर्वी इच्छुकांची समजूत घालण्यात महायुतीला यश आले असले तरी खरे चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल.

करंजकरांचे नाव चर्चेत
महायुतीत इच्छुकांना लगाम घालण्यात नेत्यांना यश आले असले तरी महाआघाडीची चिंता कायम आहे. दिंडोरीत माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी आघाडीला साथ देण्याची भूमिका घेतली असली तरी नाशिकमध्ये विजय करंजकर यांचे बंड शमविण्यात उबाठा गटाला अद्याप यश आलेले नाही. त्यात करंजकर यांचे नाव आता महायुतीकडून चर्चेत आले आहे. दुसरीकडे माजी महापाैर दशरथ पाटील यांनीदेखील अपक्ष रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

The post लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र? appeared first on पुढारी.