शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दहिवाळ शिवारात सोमवारी (दि.१) मध्यरात्री १२ च्या सुमारास गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी भूमिगत असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतातून ओसंडून वाहिले. यात दोघा शेतकन्यांचे काढणीसाठी आलेले कांद्याचे पीक तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालेगाव मनपा प्रशासनाकडे केली आहे.

मालेगाव शहराला गिरणा पंपिंग स्टेशनवरून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात आली आहे. भूमिगत असलेली ही जलवाहिनी रात्री १२ च्या सुमारास दहिवाळ शिवारात विलास जगताप व बारकू जगताप यांच्या शेतात फुटली. याची माहिती शेतकरी जगताप यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना शेतात जलवाहिनी फुटली असल्याने वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी केली. मात्र, बीजपुरवठा बंद केला जाणार नसल्याचे उत्तर मिळाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गिरणा पंपिंग स्टेशनवर फोन करून संबंधित कर्मचाऱ्यांना जलवाहिनी फुटली असल्याचे सांगत पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी देखील पाणीपुरवठा बंद करण्यास नकार दिला. उलट जलवाहिनी फुटून पाणी वाहत असल्याचे व्हिडिओ पुरावे म्हणून पाठविण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाणी वाहत असल्याचे व्हिडिओ काढून ते गिरणा पंपिंग स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना पाठविले.

त्यानंतर पाणीपुरवठा खंडित केला गेला. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत. काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांना पिके सोडून देण्याची वेळ आली. तर जगताप यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याचे जलवाहिनी फुटल्यामुळे नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

नुकसानभरपाईची मागणी
तीन ते साडेतीन तास माहिती देऊनही पाणीपुरवठा खंडित न केला गेल्याने लाखो लिटर पाणी वाहून जाण्याबरोबर शेतातील कांद्याचे पीक व मातीदेखील वाहून गेली. तर बांध फुटून मातीसह पाणी विहिरीत पडल्याने ऐन दुष्काळात दोन पैसे देणारे पीक बाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून पाणीकपात करण्यात आली असतानाच मंगळवारी (दि.२) गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी १४०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने दिवसभर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. नागरिकांना दिवसभर पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यातच स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेतात पाणी तुंबल्याने त्यांनी नुकसानभरपाईची मागणी करत दुरुस्ती कामास विरोध केला.

शहर, तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात तर पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. अनेक गावांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. तुलनेने शहरात अजूनही दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासाठी गिरणा धरण व तळवाडे साठवण तलावातून पाणी घेतले जाते. गिरणा धरणावरून पूर्ण क्षमतेने पाणी पंपिंग केले जाते. यासाठी गिरणा धरण, उंबरदे, दहिवाळ व सायने बुद्रुक शिवारातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दहिवाळ शिवारात पाण्याचा दाब वाढल्याने जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच गिरणा पंपिंग बंद करण्यात आले. परंतु मध्यरात्री बारा ते पहाटे चारपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाण्यामुळे शेतातील माती वाहून गेली तसेच कांदा पिकाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करत जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी विलास जगताप यांनी घेतली. यामुळे मंगळवारी शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला.

२४ तास  होतोय उशिराने पाणीपुरवठा
गिरणा धरणातून येणारी पाइपलाइन ही दहिवाळ शिवारात फुटल्यामुळे जलवाहिनीचे काम करण्यासाठी गिरणा पंपिंग स्टेशन २४ तासांकरिता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणीपुरवठा बुधवारी व बुधवारी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी करण्यात येणार आहे. शहरावासीयांनी याची नोंद घ्यावी व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशिराने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल मालेगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

The post शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून appeared first on पुढारी.