श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

रामनवमी रथ pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी येथील भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणजे रामनवमीनंतर भागवत एकादशीला निघणारा प्रसिद्ध रथोत्सव होय. या उत्सवातील श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.  श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठकीत रथोत्सवाच्या तयारीची माहिती देण्यात आली.

पंचवटीतील शौनकआश्रमात रथोत्सवाची बैठक पार पडली. श्री काळाराम संस्थान मंदिर प्रशासनासह अहिल्याराम व्यायामशाळेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काही दिवसांपासून रथाची डागडुजी सुरू असून संस्थानचे विश्वस्त, मंदिराचे पूजाधिकारी आणि व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी रथाची तांत्रिक चाचणी घेतली. त्यानंतर हवी ती योग्य सुधारणा व दुरुस्ती देखील करण्यात येत आहे. बैठकीत रथ मिरवणुकीचा मार्ग, रस्त्याची परिस्थिती आणि रथाच्या मार्गात लागणारी वाहने, गरुड रथाचे परीक्षण, रथ सजावटीचे काम, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना द्यावयाची निवेदने, सुरक्षा व्यवस्था, रथाची लक्षवेधी ठरणारी आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनी व्यवस्था, मार्गावरील मध्यभागी असणारे दिशादर्शक पांढरे पट्टे, रथसेवकांचा पारंपरिक गणवेश, अहिल्याराम तालमीजवळची साफसफाई, रथ यात्रेदरम्यान नेहमी येणाऱ्या अडचणी यासोबतच विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री अहिल्याराम व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि बलोपासक देखील उपस्थित होते.

हेही वाचा:

The post श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग appeared first on पुढारी.