नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा – कॉंग्रेस पक्ष हा आदिवासींना आदिवासी मानतो तर भाजपा आदिवासींना वनवासी मानतात. कारण जोपर्यंत वन किंवा जंगल आहेत तोपर्यंतच वनवासी राहतील आणि देशातील सर्व जंगले हे अडानींच्या प्रकल्पांना दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वाला धोका आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसची सत्ता आली तर प्रथम जातनिहाय जनजगणा, आर्थिक सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यावरुन कोण किती मागास आहे आणि कोणाचा किती वाटा हवा याचा एक्स रे तयार होईल, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे खा.राहूल गांधी यांनी केले.(Bharat Jodo Nyaya Yatra)
भारत जोडो तथा आदिवासी न्याय यात्रेनिमित्त कॉंग्रेसचे खा.राहूल गांधी यांनी आज नंदुरबारला भेट दिली. त्याप्रसंगी शहरातील सी.बी. पेट्रोल पंपाजवळील मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेसाठी १३५ बाय ३०० क्षेत्रात सुमारे ३४५ स्के. फूट जागेवर मंडप टाकण्यात आला होता. या मंडपाची क्षमता सुमारे १२ हजार लोक असतील अशी असून सभेला १८ ते २० हजाराचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा पक्षाच्या नेत्यांचा अंदाज होता. आज प्रत्यक्ष सभेला दहा हजाराहून अधिक लोक उपस्थित राहिले. यावेळी व्यासपिठावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, बी.एम.संदीप, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, आ.ऍड.के.सी.पाडवी, आ.शिरीष नाईक, अमित चावडा, सत्यसिंह गोयल, शिवाजीराव मोघे, प्रतिभा शिंदे, चंद्रकांत हंडोरे आदी उपस्थित होते. (Bharat Jodo Nyaya Yatra)
राहुल गांधी यांनी पेटवली होळी
आदिवासींची परंपरागतरीत्या होळी साजरी करण्याची इकडे प्रथा आहे. आधी मानाची होळी पेटते आणि नंतर गावोगावच्या होलिकोत्सवाचा प्रारंभ केला जातो तथापि आदिवासी न्याय यात्रा घेऊन राहुल गांधी यांचे आगमन झाल्याचे औचित्य साधून माजी मंत्री के सी पाडवी यांनी थेट सभेच्या मैदानावर मानतेच्या होळीचे आयोजन केले आणि स्वतः राहुल गांधी यांच्या हस्ते पेटवून आदिवासींच्या होलिकोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. सर्व उपस्थित प्रमुख नेत्यांनी त्याप्रसंगी होळीच्या भोवती घेर धरला. नंतर आदिवासी प्रथेप्रमाणे होळीच्या दांड्याचे टोक राहुल गांधी यांच्या हस्ते कापण्यात आले.
माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या उपस्थित
काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे राहुल गांधी यांच्या सभेच्या आयोजनासाठी चाललेल्या तयारी दरम्यान काही बैठकांना तसेच वरिष्ठ नेत्यांचे उपस्थित झालेल्या आढावा बैठकांना अनुपस्थित होते. अशातच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पद्माकर वाळवी हे भारतीय जनता पार्टी प्रवेश घेणार असल्याचे संकेत दिले असतानाच आज प्रत्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेलाही पद्माकर वळवी हे स्वतः अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब मानले जात आहे. तथापि पद्माकर वळवी यांच्या कन्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष एडवोकेट सीमा वळवी या राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहिल्या.
आयोजित ‘रोडशो’ असा बदलला (Bharat Jodo Nyaya Yatra)
खा. राहुल गांधी यांचा घोषित कार्यक्रम प्रत्यक्षात पूर्ण फेरबदल करून अमलात आणला गेला. घोषित कार्यक्रमानुसार खा. राहुल गांधी यांचे आज दिनांक १२ मार्च रोजी दुपारी साधारण २ वाजता नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक ग्राउंडवर आगमन होईल. त्यानंतर दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान धुळे चौफुली येथून ते रोड शो ने सभास्थळी सीबी ग्राउंडवर पोहचतील. ३.३० वाजता ध्वज हस्तांतरण, ३.३० वाजता सांस्कृतिक होळी नृत्य, ३.४५ सभा व ४.३० वाजता वाहनाने दोंडाईचाकडे प्रयाण करतील असे घोषित कार्यक्रमात म्हटले होते. यापैकी प्रामुख्याने रोडशो चा कार्यक्रम पूर्ण पालटण्यात आला. तो सभा होण्याआधी होणार होता त्या ऐवजी सभा संपल्यानंतर सुरू करण्यात आला सभास्थळापासून पोलीस मैदानावरील हेलिपॅड पर्यंत रोडशो करीत राहुल गांधी रवाना झाले.
प्रारंभी प्रास्ताविक आ.ऍड.के.सी.पाडवी यांनी केले. त्यानंतर गांधी यांना मोरखा अर्थात मोरपिस असलेला मोठा टोप देण्यात येवून त्यांच्यावर डोक्यावर ठेवण्यात आला. तसेच आदिवासींचे पारंपारिक चांदीचे अलंकार त्यांना देण्यात आले.
यावेळी खा.गांधी पुढे म्हणाले, आदिवासी आणि वनवासी मध्ये आपल्याला फरक माहित आहे का? आदिवासी हे या देशाचे मुळ मालक आहेत. जेव्हा या भूतलावर कोणी नव्हते तेव्हा फक्त आदिवासीच होते. त्यामुळे त्यांचा या पृथ्वीतलावरील जल, जंगल, जमिनीवर पूर्णतः हक्क आहे. मात्र, भाजपा हे आदिवासींना वनवासी संबोधून त्यांना आपल्या हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनवासी म्हणजे जोपर्यंत वने आहेत तोपर्यंतच वनवासी आहेत. केंद्र सरकारकडून आदिवासींची जंगले हळूहळू अडाणींच्या कंपन्यांना दिले जात आहेत. त्यामुळे काही वर्षांनंतर जंगलांचे अस्तित्व नष्ट होईल. पर्यायाने आदिवासींचे अस्तित्वही नष्ट होण्याचा धोका आहे. आपणही त्यामुळे रस्त्यावर येणार. मात्र हा धोका आपण सर्वांनी आताच लक्षात घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
खा.गांधी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी देशातील अरबपती उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा दिला नाही. आदिवासींनी घेतलेले शैक्षणिक कर्ज किती माफ झाले आहे? ज्यांना कर्जमाफीची खरी गरज आहे त्यांना न देता हे सरकार केवळ अरबपती उद्योगपतींचाच विचार करत आहे. हा देश २२ उद्योगपतींच्या हातात आहे. त्यांच्याकडे असलेली संपत्ती आणि ७० टक्के भारतीयांची संपत्ती सारखीच आहे, असेही ते म्हणाले. २४ वर्षांत मनरेगाला जितका पैसा लागतो तेवढा पैसा या २२ अरबपती उद्योगपतींचे कर्ज माफ झाले आहे.
एकही मिडीया आदिवासींच्या मालकीचा नाही
राहुल गांधी यांनी यावेळी मीडियावरही टिका केली. ते म्हणाले देशातील मीडीयाच्या मालकांची यादी तपासली तर ३० ते ४० लोक यात मालक आहेत. मात्र, एकही मिडीया आदिवासींच्या मालकीचा नाही. मुळात या ठिकाणी असलेल्या पत्रकारांची चूक नाही कारण हे पगारामुळे बांधिल आहेत. मोठ मोठ्या अँकर व रिपोर्टरची यादी पाहिली तर मीडीयात आदिवासी कोणीही नाही. त्यामुळे जल, जंगल, जमीनचा मुद्दा मीडियामध्ये दिसणार नाही. सोशल मीडियावर हे प्रश्न येतील पण माध्यमांवर येऊ शकत नाही, कारण हा मीडिया देखील बांधिल आहे. देशातील २०० बडया कंपन्यांमध्येदेखील एकही आदिवासी दिसणार नाही. तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये देखील आदिवासींची भागीदारी नाही.
एक व्यक्ती तोही कोपऱ्यात
मोदी सरकार हे ९० लोक चालवतात. त्यात आदिवासी नेते किंवा प्रतिनिधी किती आहे. त्यात एक व्यक्ती आहे पण त्यालाही कोपर्यात ठेवले जाते. आदिवासींची जनसंख्या ८ टक्के आहे. पण तुमची भागिदारी १०० पैकी १० पैसे आहे. भारतात कुठेही जा, आदिवासींवर अन्याय होत आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट येतात पण त्यात जमीन ही आदिवासींची जाते. गुजरातमध्ये २५ टक्के जमीन घेतली गेली. ती सर्व जमीन आदिवासींची आहे. पाणी, जमीन, जंगल हे सर्व आदिवासींचे जात आहे. मग देशात विकास कुठला होत आहे, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला.
पब्लिक स्कूल, प्रायव्हेट स्कूल, हॉस्पिटल यांची यादी पाहिली असता त्यातही कुठेही आदिवासी दिसत नाही. ही परिस्थिती बदलायची आहे. आदिवासी ८ टक्के, दलित १५ टक्के तर मागासवर्गीय ५० टक्के आहेत. या टक्केवारीप्रमाणे जातीनिहाय गणना होणे अपेक्षित आहे. देशात जातनिहाय जनगणना करण्यासोबतच आर्थिक आणि सर्वेक्षण करण्याची गरज आहे. लोकशाहीत ८ टक्के आदिवासींचा सहभाग नसेल तर तो झाला पाहिजे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व आर्थिक सर्वेक्षण हा कॉंग्र्रेसचा अजेंडा आहे. यातून देशाचा एक्स रे तयार होणार आहे. कॉंगे्रसचे सरकार देशात आले तर जमीन अधिग्रहन कायदा अधिक मजबूत करणार. वनजमिन कायदा भाजपाने कमजोर केला. आमचे सरकार आल्यास आम्ही एका वर्षाच्या आत सर्व वनदावे मार्गी लावू, ज्यांच्या हरकती आहेत त्यांचे दावेदेखील आगामी सहा महिन्यात मार्गी लावूजिथे आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्के आहे तिथे आम्ही संविधानातील सहाव्या सुचीची अंमलबजावणी करु. जेणेकरुन आदिवासींना स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णू जोंधळे यांनी केले. आभार आ.शिरीष नाईक यांनी मानले.
हेही वाचा :
- परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी
- Russia Military Plane Crash: रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळले; १५ ठार
- परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी
The post सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा 'एक्स रे', नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा appeared first on पुढारी.