नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने आणखी एक कोटींचा पीएफ भरूनही तोडगा निघू न शकल्याने सिटीलिंकचा संप मंगळवारी(दि.१९) सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले असून, सिटीलिंकच्या सेवेवरील विश्वास आता उडू लागला आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या ‘मॅक्स डिटेक्टीव्ह ॲण्ड सिक्युरीटीज्’ या वाहकपुरवठादार कंपनीला अखेर ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.
अल्पावधीतीच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सिटीलिंक कनेक्टींग नाशिक’ शहर बससेवेला वाहक पुरवठादाराच्या आडमुठेपणामुळे घरघर लागली आहे. गेल्या दोन वर्षात सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाला सामोरे जावे लागले आहे. मक्तेदार कंपनीने डिसेंबरच्या थकीत वेतनासह पीएफ न भरल्याने तपोवन डेपोतील वाहकांनी संप पुकारला असून, यामुळे जवळपास २१० बसेसचे संचलन गेल्या सहा दिवसापासून ठप्प झाले आहे. बस एकाच जागेवर उभ्या असल्या तरी प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे दररोज साडे आठ लाख रुपये बस आॉपरेटरला अदा करावे लागत असल्याने सिटीलिंकचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, कामगारांचे जानेवारी महिन्याचे वेतन झाले असून फेब्रुवारीचे वेतन ठेकेदाराला करण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार केल्यानंतर महापालिका त्याचे देयक मंजुर करणार आहे. दरम्यान पीएफचा मुद्दा निकाली काढला असून जवळपास चारशे वाहकांचा १ कोटींचा पीएफ त्यांच्या खात्यावर जमा केला आहे. सध्यस्थितीत जरी २१० बसेसचा प्रत्येकी एक वाहक तसेच त्यांचे पर्यायी वाहक, यापुर्वी तीन महिन्यापेक्षा अधिक काळ सेवा करून काम सोडून दिलेल्या वाहक मिळून चारशे वाहकांचे पीएफ जमा करण्यात आले आहे. दरम्यान, ईएसआयसीबाबत ठेकेदाराकडून माहिती मागवली असून ती रक्कमही भरण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. आतापर्यंत झालेल्या नऊ संपाला जबाबदार धरत मॅक्स डिटेक्टीव्ह या ठेकेदार कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे.
आतापर्यंतचा सर्वात मोठा संप
सिटीलिंकचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा संप आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२, ६ एप्रिल २०२३, ११ मे २०२३, १८ व १९ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, २२ नोव्हेंबर २०२३ तसेच फेब्रुवारी २०२४ रोजी सिटीलिंकला संपाला सामोरे जावे लागले. परंतु यापूर्वीचे संप अधिकाधिक दोन दिवसात मिटले होते. यंदाचा संप मात्र सलग सहा दिवस उलटूनही कायम राहिला आहे.
संप मिटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहकांचा १ कोटीचा पीएफ भरला आहे तर मॅक्स डिटेक्टीव्ह या कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. -प्रदीप चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक.
आज तोडगा शक्य
वाहकांनी डिसेंबरचे थकीत वेतन आणि फेब्रुवारीचे वेतन तात्काळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ठेकेदाराने पालिकेकडे फेब्रुवारीचे वेतन दहा दिवस आधी घेण्याची मागणी केली. त्याला आयुक्तांनी सहमती दिली असून फेब्रुवारीचे वेतन ठेकेदाराच्या खात्यात दहा दिवस आधी म्हणजे बुधवारी (दि.२०) जमा केले जाणार आहे. तर डिसेंबरच्या काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ठेकेदार स्वत: भरणार आहे. त्यासाठी महापालिकेने बुधवारी सकाळपासून सिटीलिंकची सेवा सुरू करण्याची अट टाकली आहे. सिटीलिंकची सेवा सुरू झाली तर, ११ वाजता वेतन अदा केले जाईल, अशी अट टाकल्याचे समजते. त्यामुळे ही सेवा बुधवार पासून पुर्ववत होण्याची शक्यता आहे.
The post सहाव्या दिवशीही सिटीलिंक संप सुरूच; अजून एक कोटींचा पीएफ भरला appeared first on पुढारी.