नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे नाशिकरोड, उपनगर व जय भवानीरोड परिसरात गुरुवारी (दि.4) रात्री दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होऊन नाशिक-पुणे रस्त्यावर दगडफेक झाली. यावेळी उपनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनानंतर रात्री दीडच्या सुमारास संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला आहे.
जय भवानी रोड परिसरात वास्तव्य असलेल्या संकेत सौदागर या तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ एक जमाव उपनगर ठाण्यात जमा झाला. सौदागर यास अटक करण्याची मागणी करीत तिथेच जमावाने ठिय्या मांडला. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी आदिंसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जमावाची समजूत काढली. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. मात्र, या दरम्यान उपनगर चौफुलीवर जमावातील काही संतप्त तरुणांनी नाशिक-पुणे रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले. तसेच जेलरोड मार्गे वाहतूक वळविली. रात्री दीड ते दोन पर्यंत संपूर्ण नाशिकरोड परिसरात तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा :
- ..तर आज दुष्काळाची तीव्रता नसती; जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
- Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर; बीड, भिवंडीमधून ‘यांना’ उतरवले रिंगणात
- K Kavitha News: के. कविता यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला
The post सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नाशिकरोडला दगडफेक appeared first on पुढारी.