Eknath Shinde : ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन, नदीपात्रात अवैध बांधकामे होऊ देणार नाही

ब्रम्हगिरीचे अवैध उत्खनन रोखणार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन व गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर बांधकाम होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. दरम्यान, ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदीपात्रातील अवैध बांधकामे तातडीने थांबवा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केली होती.

त्र्यंबक येथील प्रश्नाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की, २० डिसेंबर २०२२ रोजी त्र्यंबक येथील नदीपात्रामध्ये पर्यावरणाला बाधा निर्माण करणाऱ्या बांधकामाची साधूंच्या जत्थ्याने चिडून तोडफोड केली आहे. ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदीपात्रातील अवैध बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांवर त्र्यंबक नगरपालिकेने २२ डिसेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. गोदावरीचे उगमस्थान, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून, त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, पशुपक्ष्यांचे स्थलांतर होत असल्याचे म्हटले.

म्हणाले की, या उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी संरक्षणासाठी कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर करून परिसरातील जैवसंपदेचे जतन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केलेली आहे.

यावेळी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, ऱ्हास होणार नाही, यासाठी शासनाकडून पूर्णपणे काळजी घेतली जाईल. त्र्यंबक येथील उत्खनन व बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल.

हेही वाचा :

The post Eknath Shinde : ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन, नदीपात्रात अवैध बांधकामे होऊ देणार नाही appeared first on पुढारी.