स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम

मतदान जनजागृती pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांमध्ये निवडणूकविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. २०१९च्या निवडणुकीवेळी साधारणपणे १०० हून अधिक केंद्रांवर मतदान कमी झाले होते. त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जनजागृती मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये यांमध्ये मतदारदूत निवड, पथनाट्य, मानवी साखळी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी वाढविण्यासाठी व मतदान टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा स्वीप आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी वाढविण्यासाठी व मतदान टक्केवारी वाढावि, कमी मतदान झालेल्या ठिकाणी सूक्ष्म नियोजन करून मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल यावर काम करण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक वर्ष संपताना विद्यार्थी व पालकांच्या विद्यार्थी व पालक सभा बोलवण्यात येत आहे.

संकल्प पत्र स्पर्धा
जिल्ह्यातील विद्यार्थी घरातील आजी-आजोबा व आई-वडील यांना मतदानाला उद्युक्त करण्यासाठी संकल्प पत्र तयार करतील. या संकल्प पत्रांची जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे. तसेच दिव्यांग नागरिक व तृतीयपंथीय यांची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत.

निवडणूक साक्षरता कक्ष
प्रत्येक शाळेत निवडणूक साक्षरता कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत. या क्लबच्या माध्यमातून निवडणुकीविषयी जनजागृती करण्यात यावी, या कक्षाचे सर्व कामकाज करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी व सर्व कामकाज हे विद्यार्थ्यांकडून करण्यात यावे.

मतदारदूत ठरणार प्रभावी
मतदार केंद्रांवर वृद्ध नागरिक, दिव्यांग नागरिक यांना मतदान करण्यासाठी सहाय्यभूत व्हावे व त्याचबरोबर मतदान जनजागृतीसाठी ‘मतदार दूत’ यांची निवड करण्यात येणार आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून मतदार दूतांची निवड करावी, यासाठी स्वीप समितीच्या वतीने ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे. निवडणूक काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या मतदार दूतांचा आदर्श आचारसंहितेनंतर गौरव करण्यात येणार आहे.

रंगोत्सवातून मतदान जनजागृती
गेल्या आठवड्यात रंगपंचमी सणाचे औचित्य साधत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी बोटाला शाई लावत मतदानाविषयी प्रबोधन केले. त्याचबरोबर मतदान हा शब्द विद्यार्थ्यांनी मानवी आकृतीतून तयार करत मतदान करण्याचा संदेश दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाच वेळी रंगपंचमीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बोटाला शाई लावत मतदानाविषयी जनजागृती केली.

हेही वाचा:

The post स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम appeared first on पुढारी.