‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

हर घर जल pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजना नाशिक जिल्ह्यात पूर्णत्वास जाणार नसल्याचे समोर येत आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कामे होत आहेत. सुधारित आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १,२२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्णत्वास जात आहेत. काही कारणास्तव या योजनांमधील ४०१ कामे अपुर्ण राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, या विभागाच्या सध्याच्या कामांच्या प्रगतीवरून सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ पर्यंत ८२१ योजना पूर्ण झाल्यानंतर जूनपर्यंत २७६ व सप्टेंबर २०२४ पर्यंत उर्वरित १२५ योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. यामुळे केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत जलजीवनची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याचे सांगितले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १,२२२ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. त्यातील या १,२२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या, पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून, त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूर्णपणे नवीन असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्या ५४१ आहे. या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यात ग्रामीणपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या १,२२२ योजनांपैकी जानेवारी अखेरपर्यंत २०४ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील दीड महिन्यामध्ये केवळ ६१७ योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले असून, हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

सहा महिन्यांची मुदतवाढ
राज्यातील एकाही जिल्हा परिषदेला मुदतीत योजना पूर्ण करता येत नसल्याचे बघून आता पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्व जिल्हा परिषदांना सर्व योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे.

The post 'हर घर जल' योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर appeared first on पुढारी.