हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

महायुती pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
सलग दोन निवडणुकांत चढ्या मताधिक्क्याने विजयश्री प्राप्त करणाऱ्या नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा तिकिटासाठीचा लढा राजकीय उष्मा निर्माण करीत आहे. महायुतीच्या वर्चस्वाची गाथा सांगणाऱ्या या मतदारसंघात गोडसेंना मोठ्या भावाचे बिरुद मिरवणारा भाजपच अपशकून करण्यास धजावल्याने थेट मतदानापर्यंत एकोपा राहणार का, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. हीच अस्वस्थता ऐन शिमगादिनी गोडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या दारी घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुख्यमंत्र्यांची देहबोली आणि सावध भूमिका घेणारी भाषणबाजी लक्षात घेता नाशिकचा महायुतीचा उमेदवार कोण, हा प्रश्न काही दिवसांपुरता तरी अनुत्तरित राहणार आहे.

नाशिक लोकसभेची जागा गोडसे यांनी सलग दोन वेळा जिंकली आहे. शिवसेना विभाजित झाल्यानंतर गोडसे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाची पाठराखण केल्याने आपसूक ही जागा महायुतीत या गटाला मिळणार हे स्पष्ट झाले. तथापि, गोडसे यांच्याबाबत नाराजी असल्याच्या वार्तांना आपल्या सर्वेक्षणास्त्राचा आधार देत भाजपनेच नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे. अगदी मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला बासनात बसवत भाजपने नाशिक आमच्या हक्काचे म्हणण्याची छाती केली आहे. याच पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाणेस्थित निवासस्थानी शेकडो समर्थकांसह मोर्चा वळवला. पक्षाची सर्वच महत्त्वपूूर्ण मंडळी आल्याने एकनाथ शिंदे यांना त्याची दखल घ्यावी लागली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी संयमी वृत्तीचे दर्शन घडवत, सावध शब्दांचा वापर करीत उपस्थितांची समजूत काढली. नाशिकबाबत अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगत ज्या सात-आठ जागांवर महायुती उमेदवारांचे घोडे अडले आहे, त्याकडे भाजपचे चाणक्य स्वत: लक्ष ठेऊन असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. केवळ गोडसे यांना आपण नाराज करणार नाही, एवढे आशादायक वक्तव्य वगळता मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कोणतेही ठोस आश्वासन न जाणवल्याने गोडसे यांच्या मनातील घालमेल वाढली आहे.

दुसरीकडे कागदोपत्री भक्कम वाटणाऱ्या भाजपने यावेळी शिंदे गट नव्हे, तर आम्हाला संधी हवी म्हणून मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात गोडसे यांना अनुकूल वातावरण नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपने आपल्याकडे काही सक्षम उमेदवार असण्याचा दावा केला आहे. याच अनुषंगाने गोडसेंच्या रविवारच्या दबावतंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे उमेदवारीचा लकडा लावलेले दोन्ही पक्षांचे नेते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तथापि, उमेदवारीसाठीचा हा लकडा मनभेदात रूपांतरित होऊ नये, असा आशावाद दोन्ही घटक पक्षांतील वरिष्ठांकडून व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

शिंदे, फडणवीसांची आम्ल चाचणी
सलग दोनदा लीलया खिशात घातलेली नाशिक लोकसभेची जागा भाजपच्या पदरात टाकण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहजासहजी तयार होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांचा शिवसेना पक्ष आताशी कुठे नाशिक जिल्ह्यात बाळसे धरू पाहत असताना विद्यमान खासदाराची उमेदवारी डावलणे त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. तद्वतच मतदारसंघातील तीन आमदार आणि महापालिकेतील गेल्या वेळची एकहाती सत्ता मिरवणाऱ्या भाजपची पकड ढिली होऊ न देण्याची खबरदारी पालकत्व स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे. केवळ नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याच्या एकसुरी निर्धार आणि समान धाग्यातून दोन्ही नेत्यांना पक्षीय कार्यकर्त्यांची मोट बांधण्याच्या आम्ल चाचणीला सामोरे जावे लागणार, ही मात्र काळ्या दगडावरील धवल रेषा आहे.

The post हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड appeared first on पुढारी.