शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

Cyber Crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील विरोधात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुभाष चेवले (३९, रा. गंगापूररोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सुशील याने शासकीय नोकरी देण्याचे आमीष दाखवून ८० लाख रुपयांचा गंडा घातला. सुशीलने तो एका तत्कालीन गृह राज्यमंत्र्याच्या स्वीय सहायक असल्याचे सांगत सुभाष यांच्यासह त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दिले होते. त्यानुसार सुभाष यांनी सुशीलला ८० लाख रुपये दिले. सुशीलने त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. मात्र, हा बनाव उघड झाल्यानंतर सुभाष यांनी सुशील विरोधात गंगापूर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली व त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे.

कोट्यवधी रुपयांचा गंडा प्रकरणी गुन्हे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुशील हा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत मिरवत असतो. २०२३ मध्ये त्याच्याकडून एका मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याने नाशिक शहरासह देवळाली कॅम्प, मालेगावामधील नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. त्याने नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

संशयित सुशीलने मार्च २०२२ मध्ये गुजरात आणि राजस्थानच्या बड्या राजकीय नेत्यांसह पंधरा संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. त्यामध्ये राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाचेही नाव त्याने घेतले होते. राजस्थानचे ई-टॉयलेटसह पर्यटन विभागातील जाहिरातींच्या कंत्राटातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी त्याच्यासह इतरांची सहा कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने संशयित आरोपींपैकी राजस्थानमधील तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नावे वगळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता.

काँग्रेस पदाधिकाऱ्यासही हूल देण्याचा प्रयत्न
काही वर्षांपूर्वी संशयित सुशील हा काँग्रेस पदाधिकारी असल्याचे सांगत कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करून द्यायचा. एकदा प्राचार्यांनी एका काँग्रेस पदाधिकाऱ्याकडे सुशीलबाबत विचारणा केली. त्यावेळी सुशीलकडे पक्षाचे कोणतेही पद नसल्याचे समजले. संबंधित पदाधिकाऱ्याने सुशीलकडे विचारणा केली. तेव्हा त्याने मंत्र्यांची ओळख दिली. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्याने वरिष्ठांमार्फत त्या मंत्रीकडे चौकशी केल्यानंतर सुशीलचा बनाव उघड झाला.

हेही वाचा:

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.