अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा

नाशिक अपघात,www.pudhari.news

सिन्नर(जि. नाशिक) : सिन्नर-घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कोनांबे येथील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेने कोनांबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश भगिरथ डावरे (१७) व दुर्गेश हेमंत डावरे (२२) अशी मृतांची नावे आहेत. (Nashik Accident)

गणेश व दुर्गेश हे कोनांबे शिवारात वस्तीवर जवळजवळ रहायला होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास पल्सर दुचाकीने (एमएच १५, जेजी ९६४५) कोनांबेहून सिन्नरला निघाले होते. हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोरून जात असताना समोरून येणाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली… यामध्ये दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता.

स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. तरुणांना तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघाही तरुणांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. ऐन नवरात्रोत्सवाच्या उत्साही पर्वात दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

गतिरोधकांसाठी सरण रचून आंदोलनाचा इशारा

सिन्नर-घोटी-मुंबई महामार्गावर आठ दिवसांत स्पीड ब्रेकर बसवा अन्यथा हरसुले येथे गुरुवारी (दि.२६) सरण रचून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद शिंदे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर हरसुले, लोणारवाडी गावाजवळ स्पीड ब्रेकर अभावी छोटे-मोठे अपघात झाल्याने शिवसेनेसह ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने दिली. रास्ता रोको, ठिय्या आंदोलने केली तरीही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जागे होत नाहीत. अनेकदा मागणी केली तेव्हा सूचना फलक लावले. पण स्पीड ब्रेकर बसवण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. हरसुले, लोणारवाडी, सोनांबे, सोनारी, वडगाव, कोनांबे, धोंडवार, औढेवाडी, विंचुरीदळवी, पांढुर्ली परिसरातील ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोनांबे गावावर शोककळा

गणेश डावरे बारावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला एक भाऊ आहे. दुर्गेश डावरे हा घरात एकुलता एक मुलगा असून, तो एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. सायंकाळी उशिरा कोनांबे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे गणेश शिक्षण घेताना कुटुंबाला शेतीकामात मदत करत असे.

The post अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा appeared first on पुढारी.