ज्यांचे हप्ते चालू, त्यांचे धंदे सुरू; आमदारांकडून पोलिसांवर आरोप

पोलिस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; मंत्रनगरी, तंत्रनगरी अशी ओळख लाभलेल्या नाशिकचे नाव ड्रग्जनगरी म्हणून पुढे येत आहे. शहरामध्ये राजरोसपणे ड्रग्ज, अवैध दारू, गुटख्याची सर्रास विक्री होते. पोलिसांच्या वरदहस्ताने हे धंदे फाेफावले आहेत. ज्याचे हप्ते चालू त्याचे धंदे सुरू अशी परिस्थिती आहे, असा आरोप आमदारांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर केला. शहराची ही ओळख बदलण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा नाशिक पॅटर्न राज्यभरात रुजवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. (Nashik News)

ड्रग्जच्या कारखान्यामुळे नाशिकचे नाव चर्चेत आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (दि. १७) अमली पदार्थ विरोधी जनजागरण बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, सराेज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शैक्षणिक संस्थाचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.

देवयानी फरांदे यांनी बैठकीत पोलिसांवर शरसंधान करताना नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली असून, राेलेटची सुरुवातही आपल्यापासून होते. आता तर ड्रग्जचा कारखाना सापडला आहे. नाशिक पॅटर्न राज्यात लागू करायचा का? असा प्रश्न उपस्थित केला. आयुक्तांना सहा महिन्यांपूर्वी ड्रग्ज पेडलरची नावे देऊनही कारवाई झाली नाही. व्हिसा संपलेल्या नायजेरियन विद्यार्थ्यांचे शहरात वास्तव्य असून, त्यांच्याकडून ड्रग्जची विक्री होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. त्र्यंबक रोडवर दिवसाढवळ्या हॉटेल, लाॅजिंगमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार फरांदेंनी केली.

डाॅ. राहुल आहेर यांनी कोणाच्या आशीर्वादाने ड्रग्जचा कारखाना सुरू होता, याचा तपास करणे गरजेचे आहे. पोलिसांचाही त्यात काही सहभाग होता का? याची खातरजमा करण्याची मागणी केली. ड्रग्ज पेडलर व त्याची नशा करणारे अलर्ट झाले असून, त्यांनी खरेदी-विक्रीची भाषा बदलली आहे. त्यामुळे पोलिसांनीही तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे आवाहन केले. सीमा हिरे यांनी झोपडपट्ट्यांमधील किराणा दुकानांमधून सर्रासपणे दारूविक्री केली जात आहे. याबाबत पोलिसांना कळविले असता त्यांच्या कारवाईपूर्वी संबंधित व्यक्ती साठा नष्ट करत असल्याचा दावा केला. सरोज अहिरे यांनी ड्रग्ज, दारू प्रकरणात पोलिसांचे लागेबांधे आहेत. वरिष्ठ अधिकारी चांगले काम करत आहेत. परंतु, कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांची मानसिकता दिसून येत नसल्याची व्यथा मांडताना संपर्क साधूनही पोलिस वेळेवर कारवाईसाठी येत नसल्याची तक्रार केली. यावेळी संस्थाचालक, प्राध्यापकांनी विविध सूचना बैठकीत केल्या.

बैठकीमधील सूचना

– शाळा-महाविद्यालयांच्या सुटण्याच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी

– शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारावरील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा

– प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अमली पदार्थविरोधी समिती गठीत करावी

– तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात यावा

– हुक्का पार्लरवर कारवाई करावी

– शाळेच्या जवळील पानटपऱ्या, दुकाने व वाइन शॉप्स तपासावेत

– शाळकरी मुले नशेसाठी व्हाइटनर घेत असल्याने त्याला प्रतिबंध करावा

– सोशल मीडियाच्या मदतीने मुलांमध्ये जनजागृती करावी

– प्राध्यापक, विद्यार्थी, पालकांच्या समितीने दरमहा चर्चा करावी

हेही वाचा :

The post ज्यांचे हप्ते चालू, त्यांचे धंदे सुरू; आमदारांकडून पोलिसांवर आरोप appeared first on पुढारी.