चांदवडला १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक

लाच

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून कुंदलगावचे अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी विजय राजेंद्र जाधव (३३, वलवाडी, देवपूर धुळे) यांनी १० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवार (दि.१८) रोजी दुपारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल, कृषी, पोलीस व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

तालुक्यातील कुंदलगाव येथील तक्रारदार यांच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव येथील गट नबर ४१०, ४१२, ४१४ या गटातील ५० – ५० गुंठे जमिनीवर तक्रारदारांच्या आई, त्यांचे मामा व नातेवाईक यांच्या नावांची सातबा-याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी चांदवड तहसीलदार यांचेकडे अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकारी यांचे मार्फत कुंदलगावचे अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी विजय राजेंद्र जाधव यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या कामासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती १० हजार रुपये ठरले होते. याबाबत तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सोमवार (दि.१८) रोजी लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव, पोलीस हवालदार प्रणय इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, पोलीस हवालदार विनोद पवार यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून तलाठी विजय जाधव यांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा :

The post चांदवडला १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक appeared first on पुढारी.