अयोध्या साेहळा : शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अयोध्येतील प्रभू रामलल्ला यांचा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न साकार होत असल्याने नाशिककरांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अवघी नाशिकनगरी रामनामात दंग झाली आहे. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये स्वच्छता करताना आकर्षक विद्युत रोषणाईने ती न्हाऊन निघाली आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभू रामचंद्र यांच्यामुळे अयोध्या ते नाशिक अशी धार्मिक नाळ घट्ट जुळलेली आहे. तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयाेध्येतील भव्य मंदिरात सोमवारी (दि.२२) प्रभू रामचंद्र यांचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने अवघे नाशिक शहर रामभक्तीत रममाण झाले आहे. शहर-परिसरातील प्रमुख मंदिरांवर विद्युत रोषणाईसह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी भगव्या पताका उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये जणू दिवाळीसारखे वातावरण अनुभवायला मिळते आहे. मंदिर व्यवस्थापन समिती तसेच निरनिराळ्या धार्मिक व सामाजिक संस्थांतर्फे भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदवलेकर मंदिरात उत्सव

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर राेडवरील श्री गोंदवलेकर महाराज मंदिरात श्रीरामोत्सव साजरा केला जात आहे. या तीनदिवसीय उत्सवात पहाटे काकड आरती, महाआरती, संगीत, भजन, श्रीराम जप, सामुदायिक रामरक्षा पठण, सहस्त्रनाम, श्रीराम चिंतन आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सिंधी समाजातर्फे कार्यक्रम

सिंधी पंचायत समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तपाेवन लिंक रोडवरील रामीबाई भवनमध्ये रात्री आठ वाजता महाआरती केली जाणार आहे. याशिवाय देवळाली कॅम्प, पंचवटी, होलाराम कॉलनी व नाशिकरोड आदी भागांतही कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाकडून करण्यात आले आहे.

पंचमुखी हनुमान मंदिरात भजन

आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरात सोमवारी (दि.२२) सकाळपासून सुंदरकांड, भजन-कीर्तन तसेच रामरक्षा पठण केले जाणार आहे. सायंकाळी सामूहिक आरती व दीपोत्सव साजरा केला जाईल. पेठ रोडवरील भक्तिधाम मंदिरातही सजावट करण्यात आली आहे. दुपारी महाआरती व ११०० दिवे प्रज्वलित केले जातील.

हेही वाचा:

The post अयोध्या साेहळा : शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुढारी.