असहय् उकाड्यामुळे अंगणवाडी होरपळली; वेळेत बदल

अंगणवाडी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरात सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. जिल्ह्यात मालेगाव परिसरात तर ते ४२ अंश सेल्सिअस पार गेले असून उष्णतेची लाट आली आहे. अशा काळात वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंगणवाड्या सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत भरणार असून पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते दहा अशी केली आहे. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यात आगामी काळात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी राहील. सकाळी आठ ते दहा या कालावधीत प्रत्यक्षात बालके अंगणवाडीत उपस्थित राहतील, यात बालकांना पूर्व शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार देण्यात येणार आहे.

दहा ते साडेअकरा या कालावधीत अंगणवाडी सेविका गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे आदी कामे करावीत. नागरी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा अशी राहील, सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत बालके अंगणवाडीत उपस्थित असतील. यात त्यांना पूर्व शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार दिला जावा, अकरा ते दुपारी बारा या कालावधीत अंगणवाडी सेविका गृहभेट देणे, अंगणवाडीतील नोंदी घेणे, कार्यालयीन दस्तावेज अद्ययावत ठेवणे ही कामे करावीत, असे पाटील यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

अशी करा कार्यवाही
बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अंगणवाडीत उपस्थित ठेवावे, बालकांसाठी ओआरएस ठेवावे, बालकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अमृत आहार अंतर्गत देण्यात येणारा चौरस आहारही गरोदर व स्तनदा मातांना दुपारी बारापूर्वी द्यावा.

हेही वाचा: