उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

देवेंद्र फडणवीस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या सध्याच्या मार्गात अनेक ठिकाणी बोगदा करावा लागणार असल्यामुळे या मार्गाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या अलायमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार आहे. यामुळे रेल्वेमार्गाचे अंतर हे ३३ किलोमीटरनी वाढणार असले तरी नाशिक-पुणे अंतर दोन तासात गाठता येईल. केंद्रीय कॅबीनेटसमोर हा प्रस्ताव जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आमदार प्रा. देवयानी फरांदेच्या प्रयत्नातून उभारलेल्या मेळा बसस्थानकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. निओ मेट्रोसह नाशिक पुणे सेमी हायस्पीड संदर्भात नवी माहिती फडणीस यांनी यावेळी दिली. नाशिक पुणे रेल्वेमार्ग हा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. प्रथम राज्यसरकारने हा मार्ग करावा असा विचार होता. मात्र माझी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांच्याशी चर्चा झाली. सध्या राज्यसरकारने मंजूर केलेल्या नाशिक पुणे रेल्वेमार्गाचा जो रुट आहे, त्यात अनेक ठिकाणी बोगदा करावा लागणार आहे. त्यामुळे या मार्गाची किंमत वाढत असल्याने या मार्गाची अलायनमेंट बदलण्याचा केंद्राने निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेंमंत्र्यानी आपल्याला दिल्याचे फडणवीस यांनी सांगीतले. हा रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी होणार असून त्यामुळे ३३ किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. परंतु,हा सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असल्याने गाडीचा स्पीड असा राहील की, ज्याने वेळेचे अंतर भरून निघणार आहे. त्यामुळे शिर्डीचा आणि पुण्याचाही फायदा होणार असल्याने हा प्रस्ताव आता केंद्रीय कॅबिनेटपुढे ठेवला जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर नाशिक पुणे रेल्वेमार्गाचे नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होईल असा दावा फडणवीस यांनी केला.

बोईंगचा प्रकल्प एचएएल मध्ये
एचएएल मध्ये बोईगचा विमान बांधनी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहितीही फडणवीस यांनी दिली. बोईंगचे सीईओ सलील गुप्ते यांची मी नुकतीच भेट घेतली असून त्यांना बोईंगचा हा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू करावा यासाठी राज्यसरकारमार्फत बोलणी सुरू असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगीतले. बंगलोर येथे हा प्रकल्पाबाबत बोलणी सुरू असली तरी,बंगलोर पेक्षा अधिक सुविधा राज्यसरकार कंपनीला देईल असे आश्वासन आपण देवून टाकले असून ते केंद्र सरकारसोबत बोलणार असून हा प्रकल्प नाशिकला आल्यास नाशिकच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगीतले.

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार appeared first on पुढारी.