गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ

गोदा आरतीwww.pudhari.news

नाशिक : पृत्तसेवा- दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरुन उद‌्भवलेल्या वादाचे प्रतिबिंब सोमवारी (दि. १९) आरतीवेळी उमटले. पुरोहित संघ व शासनाच्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने रामकुंड परिसरात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या आरती केल्या. त्यामुळे मुळ उद्देश असलेल्या नाशिकच्या ब्रॅन्डींगलाच खीळ बसत असल्याने नाशिककरांमध्ये असंतोष आहे. (Goda Aarti Nashik)

वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची भव्यदिव्य आरतीसाठी शासनाने ११ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीमधून रामकुंड परिसरात आरतीकरीता विविध कामे उभी राहणार आहेत. या माध्यमातून देश-विदेशामध्ये नाशिकचे ब्रॅन्डींग करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. परंतु, शासनाच्या निधीवरुन उ‌द‌्भवलेला वाद आणि त्यावरुन महिनाभरापासून घडलेले रामायण यामुळे मुळ उद्देशच बाजूला राहिला आहे. (Goda Aarti Nashik)

मुळातच गोदा आरतीसाठी शासनाने गठीत केलेली रामतीर्थ गोदावरी सेवा समिती ही पहिल्या दिवसापासून वादातीत अडकली आहे. समितीकडून विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार साधु-महंतांसह समाजातील विविधस्तरातून पुढे आली आहे. तर अनादी काळापासून रामकुंडावर धार्मिक विधी पार पाडणाऱ्या पुरोहित संघाचा समितीलाच विराेध आहे. त्यावरुनच खरी वादाची ठिणगी पडली आहे. याचे पर्यावसन म्हणजे सोमवारची महाआरती म्हणता येईल. पुराेहित संघ व समितीने एकाच दिवशी तसेच एकाच वेळी गोदावरीची स्वतंत्र्य आरती केली. या प्रकारामुळे कुठे तरी नाशिकच्या नावललाैकिकाला धक्का लागला आहे. त्यामुळे धार्मिक ठिकाणी तरी राजकारण आणू नका, अशी कळकळीची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

The post गोदा आरतीचा वाद, नाशिकच्या ब्रॅन्डींगला खीळ appeared first on पुढारी.