वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार

वस्रांतरगृह नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकीकडे गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीत वाद सुरू असताना आता वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याची कारवाई महापालिकेने सुरू केल्याने पुरोहित संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुरोहित संघाकडून वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पंचवटी पोलिस ठाण्याकडे पत्राद्वारे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे पुरोहित संघ विरुध्द महापालिका असा नवी संघर्ष उभा राहिला आहे.

रामकुंडावर गोदास्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महापालिकेने १९९२मध्ये वस्त्रांतरगृहाची इमारत उभारली. सदर इमारत गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघाच्या ताब्यात आहे. त्यामुळे वस्त्रांतरगृह उभारणीचा मूळ उद्देशच हिरावला गेला आहे. हे वस्त्रांतरगृह गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ यांना तीन वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्वावर करारान्वये देण्यात आले होते. यासंदर्भातील महापालिका आणि पुरोहित संघातील करार १९९५ मध्ये संपुष्टात आला. मात्र त्यानंतरही पुरोहित संघाचा या इमारतीवरील ताबा कायम आहे. २०१५ मध्ये सदर इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू त्यावरून वाद उद्भवला. आता गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच पुरोहित संघाने सत्तारुढ भाजपच्या दोन आमदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे महापालिकेनेही आता पुरोहित संघावर वक्रदृष्टी फिरवली आहे. वस्त्रांतरगृहच्या वापराबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश पालिकेने आधीच दिले होते. तरीही पुरोहित संघाने याबाबतची कागदपत्रे दिली नसल्याने अखेरीस मिळकत विभागाने वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याचे निर्देशच पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पंचवटी विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन यांनी पंचवटी पोलिसांकडे वस्र्रातरगृह ताब्यात घेण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

शिवजयंतीमुळे लांबली कारवाई

पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाचा ताबा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या आठवड्यात बंदोबस्तासाठी पंचवटी पोलिस ठाण्याला पत्र दिले होते. मात्र सोमवारी(दि.१९) शिवजयंतीमुळे बंदोबस्त मिळू शकला नव्हता. आता पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी झाल्याने आठवडाभरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

वस्रांतरगृह पाडणार?

गोदापात्रातील काँक्रीटीकरण हटविल्याची कारवाई केल्यानंतर आता वस्त्रांतरगृहाचे पाडकामही महापालिकेकडून हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी वस्त्रांतरगृह हटवून रामकुंड अतिक्रमणमुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

The post वस्त्रांतरगृह पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेणार, संघर्ष पेटणार appeared first on पुढारी.