‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी

कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वडाळा गावात एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित ‘छोटी भाभी’च्या ड्रग्ज तस्करीतील गुन्हेगारांची साखळी उघड होत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून सलमान शकील अहमद उर्फ फालके (३०) यास अटक केली आहे. हा संशयित छोटी भाभीला एमडी पुरवत असल्याचे समोर आले आहेत. शहर पोलिसांनी याप्रकरणात आत्तापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने सलमान यास पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nashik Drug Case)

नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ५ ऑक्टोबर रोजी एका झोपडीतून ५४.४ ग्रॅम एमडीसह एक किलो गांजा असा दोन लाखांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात वसीम रफिक शेख (३६) व नसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (३२, दोघे रा. सादिकनगर, वडाळा गाव) यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सात-आठ मोबाइल पथकाने जप्त केले. तसेच सखोल तपासात छोटी भाभीला तिचा पती संशयित इम्तियाज हा एमडी आणून देत असल्याचे स्पष्ट झाले. इम्तियाज यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील चौकशीतून त्याने एमडी भिवंडीतील सलमानकडून घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे व हेमंत फड यांच्या पथकाने संशयित सलमान यास ताब्यात घेतले. त्याला रविवारी (दि.२२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील पेडलर गजाआड

सामनगाव येथे कारवाई करीत जप्त केलेल्या १२.५ ग्रॅम एमडी प्रकरणात आतापर्यंत गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिष ऊर्फ गुड्या शांताराम चौधरी यांना अटक केली. त्यानंतर शहरातील मुख्य पेडलर अर्जुन सुरेश पिवाल, सनी अरुण पगारे, सुमित अरुण पगारे आणि मनोज ऊर्फ मन्ना भरत गांगुर्डे यांनादेखील पोलिसांनी अटक केली. हे संशयित शहरात एमडी वितरीत करत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post 'छोटी भाभी' ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी appeared first on पुढारी.