जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप

जळगाव दूध संघ वाद,www.pudhari.news

जळगाव : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दूध संघावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांची सत्ता असून, त्यांच्या विरोधात आता भाजप आणि शिंदे गट मिळून उभे ठाकले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार खडसे यांनी मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय, अशी टीका केली होती. यावर आता आमदार चव्हाण यांनी पलटवार केला असून, थेट खडसेंचा बापच काढल्याने राजकारण चांगलेच पेटले आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळाले आहे. माझा बाप काढता, तुमचा बाप काय धीरूभाई अंबानी होता काय? असा सवाल करत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे हे स्वतःला एवढे मोठे नेते समजत असतील तर त्यांना माझी भीती बाळगण्याचं कारण नाही. माझ्यासारख्या एवढ्या छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी बोलण्याचं कारण नाही. मात्र, वयोमानाने त्यांचा तोल जात असेल असा टोलाही आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. एकनाथ खडसे यांनी स्वतःसाठीच आणि कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं. स्वतःकडेच त्यांनी पक्षाला गहाण ठेवलं. एकनाथ खडसे सांगतात की माझा बाप असा होता, माझा बाप तसा होता, मात्र एकनाथ खडसे यांचा बाप काय धीरूभाई अंबानी नव्हता, असे म्हणत खडसे हे वयाने मोठे असल्याने आम्ही काही ठिकाणी त्यांचा आदर करतो, मात्र त्याचा ते गैरफायदा घेतात.

खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे…

एकनाथ खडसे यांना माझं आव्हान असून त्यांनी सिद्ध करावं की मी कुणाकडून एक रुपया खाल्ला. नाही तर माझ्याकडे त्यांनी कुणा कुणाकडून कसे आणि कधी पैसे घेतले याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे मला आव्हान द्यायला लावू नका, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंना दिला आहे. तुम्ही जर माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे आहे, असे म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे.

हेही वाचा :

The post जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप appeared first on पुढारी.