ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी

आंबेडकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रविवारी (दि.१४) शहरासह उपनगरांमध्ये धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, सर्वच मंडळांनी त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, निळे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. भीमसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून, मिरवणूकीसाठी चित्ररथ देखील सज्ज आहेत.

यंदा लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी असल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळांसह राजकीय पक्षांनी देखील भीमजन्मोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे यंदाच्या जयंती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, चौकाचौकात भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. नाशिक शहरासह नाशिकरोड भागात भव्य देखावे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय आंबेडकरी अनुयायांकडून घरांवर तसेच इमारतींवर निळे तसेच पंचशील ध्वज लावण्यात आले आहेत. काहींनी घरे तसेच इमारतींवर निळी पताका व विद्युत रोषणाई केली आहे. विविध वाहने, रिक्षा, शहरातील चौका-चौकांमध्ये निळ्या रंगाचे ध्वज लावण्यात आल्याने, संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. दरम्यान, विश्ववंदनीय महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ उत्सव नको तर परिवर्तनाचा जागर व्हावा, जयंती उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणात साजरी करावी तसेच सामाजिक सलोखा जपावा असे आवाहन प्रशासनासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांकडून केले जात आहे.

आकर्षक विद्युत रोषणाई
भीम जयंतीनिमित्त शहरासह उपनगरांमधील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच समाज मंदीरांची रंगरंगोटी केल्याने, त्यास झळाळी मिळाली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चौकाचाकात व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, अंबड, सिडको, पाथर्डीगाव, उपनगर, मोठा राजवाडा, जेलरोड आदी परिसरात भीमजयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्या मोठमोठ्या स्वागत कमानी तसेच फलक लक्ष वेधून घेत आहेत.

सामाजिक उपक्रम
विविध संस्था तसेच सार्वजनिक मंडळांकडून भीम जन्मोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन, पुस्तकांचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, ग्रेटभेट सारखे कार्यक्रम, सुशिक्षित कुटुंबांचा सत्कार, विविध स्पर्धा, नेतृत्व व वकृत्व विकास शिबिर, पथनाट्यातून प्रबोधन, कलामहोत्सव, भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन यासह वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अन्नदान, विद्यार्थी गुणगौरव यांसारख्या उपक्रमांचे आयोजन मंडळांनी केले आहे.

फाळके स्मारकात तयारी
जुन्या नाशकातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केला आहे. भद्रकाली परिसरातील मोठा राजवाडा येथून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शालिमार येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीची सांगता होणार आहे. फाळके स्मारकाजवळील बौद्धविहार परिसरातही बांधव उपस्थित राहणार असल्याने, त्याठिकाणी देखील त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post ठिकठिकाणी स्वागत कमानी; सामाजिक उपक्रमांची जय्यत तयारी appeared first on पुढारी.