डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती

पंचवटी pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

अयोध्या आणि नाशिकचे जवळचे नाते असून, प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांच्या काळात अनेक संकल्पपूर्ती करत देशाचा नेता कसा असावा, हे सिद्ध केले. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान मोदीच होतील, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले.

प्रशासकीय बैठकीसह विविध कामांसाठी शहरात दाखल झालेल्या डॉ. गो-हे यांनी श्री काळाराम मंदिरास भेट देऊन आरतीही केली. दर्शनानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. यानंतर त्यांनी आ. राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी भेट दिली. श्री काळाराम मंदिराचे विश्‍वस्त मंदार जानोरकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यापूर्वीही अनेकदा श्रीराम मंदिरात आले. मात्र भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामांचा वनवास संपून अयोध्येत भव्य मंदिराच्या निर्मितीने अधिक आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. जीवनातील अनेक संकल्प पूर्ण झाले, तर श्रीरामासमोर नव्याने काही संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. अनेक संकल्पांची पूर्तता करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा नेता कसा असावा, हे सिद्ध केले. त्यामुळे मोदीच पुढील निवडणुकीनंतर पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करताना, राजीनामे अनेक प्रकारचे असल्याचे सांगत काही जण राजीनामे खिशातच ठेवत असल्याचा टोला लगावला. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यावर तोडगा काढण्याची अपेक्षा त्यांनी केली. कल्याणमधील गोळीबार प्रकरणी त्यांनी सर्वांचेच पाय मातीचे असल्याचे सांगत यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष घालतील, असे सांगून अधिक भाष्य टाळले.

धार्मिक पर्यटनातही वाढ व्हावी
युवाशक्ती आयटी क्षेत्रात मोठे नाव करत असतानाच सर्वच क्षेत्रांतील बेरोजगारी कमी व्हावी. तसेच देशातील धार्मिक पर्यटन वाढल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. खरेतर राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात जातीची पट्टी नको, तर जातपात विरहित राजकारण व्हावे, अशी अपेक्षा डॉ. गो-हे यांनी व्यक्त केली.

The post डॉ. नीलम गोऱ्हे : यांच्याकडून काळाराम मंदिरात आरती appeared first on पुढारी.