ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; हुशार आणि अनुभवी माणसाबद्दल कधीच बोलायचे नसते, ती मोठी माणसे आहेत. त्यांना डावपेच माहिती आहेत. सुख गिळणाऱ्या माणसाबद्दल आपण काहीच बोलत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. नाशिक दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, जिल्हा एका माणसाचा नाही, तर जिल्हा सगळ्यांचा आहे. समाज या जिल्ह्याचा मालक असल्याचेही ते म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, ‘भुजबळ त्यांच्या ओबीसी समाजाची बाजू घेत आहेत, मात्र मराठा नेते समाजाला पाठिंबा देत नाही, ही आमची शोकांतिका आहे. त्यांनी साथ दिली असती तर दोन तासात आरक्षण दिले असते. पण त्यांनी दुकानापूरते वैयक्तिक हित पाहिले. कधीकाळी ते साथ देतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. राज्यभरात कुणबी नोंदी सापडत आहेत. शासन आणि प्रशासनाचे काम मराठा समाज करीत आहे. कुणबी लोकप्रतिनिधींविषयी बोलताना जरांगे म्हणाले, त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे म्हणून हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे. या लोकप्रतिनिधींनी आमचे भविष्य हिरावून घेतले, त्यांनी लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते येणार आणि बोलून जाणार, नंतर दोन दिवसांनी पुन्हा बदलणार. प्रत्येक वेळी गरीब मराठ्यांचा विश्वासघात केला म्हणून सामान्य मराठा उठला आहे.

बुलढाण्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवर जरांगे-पाटील म्हणाले, याविषयी मी माहिती घेणार होतो, मात्र उशीर झाला. अधिकृत माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य नाही. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे. कुणी जाती आणि समजात तेढ निर्माण केली तरी आपण शांततेत आंदोलन करायचे आहे. मराठा आरक्षण शेवटच्या टप्प्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी शांततेत आंदोलन करा. सर्वांना शांत राहा हे शासनाने सांगायला पाहिजे, पण ते काम आम्ही करीत असल्याचेही ते म्हणाले.

तर अजित पवारांवर ट्रकभर गुलाल उधळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील आमदारांना मराठा आरक्षणाविषयी सांभाळून बोलण्याची तंबी दिली आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, त्यांनी आरक्षणासाठी पण तंबी द्यावी. आम्ही त्यांचे स्वागत करू, ट्रकभर गुलाल घेऊन त्यांच्याकडे जातो. त्यांनी तंबी दिली तर मी असाच नाशिकवरून घरी जाईल. लाखो मराठे स्वागताला बोलावतो, असेही ते म्हणाले.

The post ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील appeared first on पुढारी.