थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

थंडी, (संग्रहित) www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहर व परिसरामध्ये वातावरणातील बदल कायम असून, रविवारी (दि.१७) पारा थेट १२.६ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. हवामानात होणाऱ्या या बदलानंतर नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. (Nashik cold)

उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरी तसेच नाशिकमधील कोरड्या हवामानामुळे थंडीचा जाेर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऱ्यात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. आठवड्याभरात शहरातील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये तब्बल तीन ते चार अंशांची घसरण झाली. रविवारी पारा थेट १२.६ अंशांपर्यंत खाली आहे. परिणामी, दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. तर पहाटे तसेच मध्यरात्रीच्या वेळी वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने बाेचऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. दरम्यान, पहाटेच्या वेळी गार वाऱ्यांसोबत धुके पडत असल्याने शहरातील दैनंदिन जीवनावर त्याचा प्रभाव पडत आहे. (Nashik cold)

थंडीच्या वाढत्या कडाक्यासोबत नाशिककरांमध्ये सर्दी-पडसे व ताप यासारखे व्हायरल आजार बळावले आहे. घरटी एक किंवा दोन व्यक्ती या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुूळे थंडीपासून बचावासाठी आता उबदार कपड्यांसह गल्लोगल्ली शेकोट्यांभाेवती नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान, चालू महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पाऱ्यात लक्षणीय घट होऊन थंडीचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज आहे.

निफाडला ११.५ अंशांवर पारा (Nashik cold)

द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यातही पाऱ्याची घसरण कायम आहे. कुंदेवाडी येथील गहू संशाेधन केंद्रामध्ये पारा ११.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. पाऱ्यातील ही घसरण गव्हासाठी पोषक असली तरी द्राक्षबागांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे बागा वाचविण्यासाठी शेतकरी आता धूरफवारणीवर लक्ष देत आहेत. दुसरीकडे मालेगावसह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतही पाऱ्यात लक्षणीय घसरण झाल्याने जनतेला हुडहुडी भरली आहे.

हेही वाचा :

The post थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.