नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर ‘संक्रांत’

नॉयलॉनमुळे पक्षी जखमी,www.pudhari.news

नाशिक : आनंद बोरा

जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकरसंक्रांत या सणाचे. संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोऱ्याचा किंवा घरगुती मांजाचा वापर केला जायचा. आता मात्र पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा (Nylon Manja) वापर केला जात असल्याने पक्ष्यांबरोबरच मानवी जीवनावरदेखील यामुळे संक्रांत येत आहे. पतंग काटाकाटीच्या खेळात दरवर्षी शेकडो पक्षी बळी पडत असून, नागरिक देखील गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेता दिल्लीत या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातदेखील याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशातही सर्रासपणे या मांजाची विक्री केली जात असल्याने, मकरसंक्रांत या गोडवा निर्माण करणाऱ्या सणाला काहीसे कडवट रूप प्राप्त होत आहे. नायलॉन मांजामुळे आतापर्यंत शेकडो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहेे. निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पक्ष्यांचा मोठा राबता आहे. दरवर्षी विदेशी पक्षी स्थलांतर करीत नाशिकमध्ये मुक्कामासाठी येतात. याव्यतिरिक्त पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती नाशिकमध्ये आढळून येतात. मात्र, नायलॉन मांजा या पक्ष्यांच्या जीवावर उठत आहे. हा मांजा कुजत किंवा नष्ट होत नसल्याने, वर्षानुवर्षे या मांजाचे दुष्परिणाम पक्ष्यांना भोगावे लागत आहेत. केवळ पक्षीच नाहीत तर मानवी जीवनासाठीदेखील हा मांजा घातक ठरत आहे. या मांजामुळे आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना तर मांजामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींचा जीवही गेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मांजावर बंदी आणली गेली असली तरी, त्याचा सर्रासपणे वापर केला जात आहे. (Nylon Manja)

२४ पक्षी गतप्राण; ३८ जायबंद

मागील दोन वर्षांत जिल्ह्यात तब्बल २४ पक्षी गतप्राण झाले असून, ३८ पक्षी जायबंद झाले आहेत. यामध्ये पोपट, चिमणी, साळुंकी, कावळे, कबूतर, दयाळ, आदींचा समावेश आहे. रात्री भरारी घेणारे गव्हाणी घुबडही यास बळी पडले आहेत. घार, कापशी घार, बगळे, शराटी या पक्ष्यांवर दरवर्षी संक्रांत असते.

या पक्ष्यांवर ‘संक्रांत’

शराटी, घुबड, पांढर्‍या माणेचा करकोचा, राखाडी छातीची पाणकोंबडी, ग्रेट थिकणी, शिक्रा, चिमणी, कबुतर, पोपट, कावळे, साळुंकी, घार आदी पक्षी नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून बळी पडतात.

एक वर्षाची शिक्षा

नायलॉन मांजा, काचेचा मांजा साठा व विक्री करण्यास बंदी असून, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७/१/अ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. कमीत कमी चार महिने आणि जास्तीत जास्त एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

२०१७ साली राष्ट्रीय हरित लवादाने मांजाचा व्यापार, साठवणूक, विक्री व वापर यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विविध कायद्यांतर्गत कारवाई करता येते. मात्र, याबाबत शासकीय यंत्रणा व नागरिकांमधे जनजागृती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे याबाबत प्रयत्न केले जात आहेत. – डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र

नायलॉन मांजा न वापरता पतंग उडविण्याचा आनंद घ्यायला हवा. जखमी पक्षी आढळल्यास तत्काळ वनविभाग किंवा पक्षिमित्रांशी संपर्क साधावा. शक्यतो, खुल्या मैदानात पतंगी उडवाव्यात. – शेखर देवकर, प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक, नांंदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

नायलाॅन मांजामुळे जखमी पक्ष्यांवर उपचार करणे अवघड असते. अनेक पक्ष्यांना कायमस्वरुपी अपंगत्व येते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर पिंजऱ्यात किंवा झूमध्ये राहावे लागते. नायलॉन मांजाच्या बंदीची कठोर अंमलबजावणी आणि विद्यार्थांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे – डॉ. संजय गायकवाड, सहआयुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन

हेही वाचा :

The post नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर 'संक्रांत' appeared first on पुढारी.