नाशिकच्या जानोरी गावात दारुची बाटली आडवी

दारुची बाटली आडवी,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

जानोरी येथील सरकारमान्य देशी दारू दुकान हटविण्यासाठी महिला ग्रामसभेत एकमुखाने पुन्हा एकदा ठराव संमत करण्यात आला. दारू दुकानाबरोबरच गावातील अवैध धंदे बंद करण्याचा ठरावही महिलांनी मंजूर केला.

जानोरी ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिलांची संख्या लक्षणीय असल्याने ग्रामपंचायत सभागृह अपुरे पडले. त्यामुळे गणपती मंदिर सभागृहात ग्रामसभा पार पडली. ग्रामविकास अधिकारी के. के. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून सभेला सुरुवात केली. सन 2023-24 वर्षांच्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे, ग्रामविकास आराखड्यास मंजुरी देणे, घरकूल लाभार्थी यादीला मंजुरी देणे, पेसा मोबिलायझरची निवड करणे, अनुसूचित क्षेत्रातील समित्या स्थापन करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत तसेच सरकारमान्य देशी दारू दुकान हटविण्याबाबत मागणी करूनदेखील संबंधित विभागाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही, याबद्दल अनेक महिलांनी आपल्या भाषणात जोरदार टीका केली.

यावेळी उपसरपंच हर्षल काठे, गणेश तिडके, गणेश विधाते, विलास काठे, सदस्या कमल केंग, रोहिणी वाघ, वैशाली विधाते, चित्रालेखा तिडके यांच्यासह गंगावती वाघ, हिराबाई भोई, सुमन घोरपडे, रंजना ठाकरे, ममता बस्ते, दीपाली बोरस्ते, सुनीता गायकवाड, विठाबाई गांगुर्डे, संगीता भोये आदींसह महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जानोरी गावात दारुची बाटली आडवी appeared first on पुढारी.