नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त

ड्रग्जविरुद्धची लढाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने म्हसरूळ परिसरातील युवकाकडून एमडीचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हा एमडी विक्रीच्या प्रयत्नात होता.

धम्मराज ऊर्फ सागर शार्दूल (१८, रा. म्हसरूळ) असे संशयिताचे नाव आहे. शहरात मुंबई, नाशिक पोलिसांनी एमडी तयार करणारे कारखाने, गोदाम उघडकीस आणल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात एमडी विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यानुसार एमडी विक्रीप्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेचे अंमलदार विलास चारोस्कर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित धम्मराज हा हनुमाननगर परिसरातून बुधवारी (दि.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पथकाने त्यास सापळा रचून पकडले.

त्याच्याकडून एमडी साठ्यासह दुचाकी, मोबाइल, कागदपत्रे असा ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताने ड्रग्ज कुठून आणले व त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा पोलिस तपास करत आहेत. संशयिताविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त appeared first on पुढारी.