नाशिकमध्ये संजय राऊतांची पाठफिरताच 11 माजी नगरसेवक शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

दोन दिवसांपूर्वी नाशिक दौ-यावर आलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पाठ फिरताच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील 11 माजी नगसेवकांसह एका मनसे पदाधिका-याने शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

नाशिकमध्ये काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. ठाकरे गटात चाललेली अंतर्गत खळबळ, शिंदे गटात जाणाऱ्यांची चर्चा यामुळे ठाकरे गट अस्वस्थ होता. अशातच नाशिक शिवसेनेला उभारी देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले.  आठ दिवसांमध्ये संजय राऊत यांनी दोन वेळा नाशिकचा दौरा केला. दोन वेळा त्यांनी पत्रकारपरिषद घेत ठाकरे गटात कुठलीही गटबाजी नाही, एकही माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असा ठाम दावा केला. पंरतु नाशिकमधून राऊत बाहेर पडत नाही तोच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. ठाकरे गटाच्या 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने डॅमेज कंट्रोल रोखण्यात संजय राऊत हे अपयशी ठरले आहेत.

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री ठाकरे गटाच्या 11 माजी नगसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करणा-यांमध्ये, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, आर.डी.धोंगडे, ज्योती खोले, सुदाम ढेमसे, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खाडे, पुनम मोगरे, राजु लवटे यांच्यासह मनसे पदाधिकारी सचिन भोसले यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाभुसे व खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.

The post नाशिकमध्ये संजय राऊतांची पाठफिरताच 11 माजी नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.