नाशिकमध्ये साकारली ७५ हजार पुस्तकांची भव्य शिवप्रतिमा

75 हजार पुस्तकांची शिवप्रतिमा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-   श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या ‘कुळवाडी भूषण’ या ग्रंथाच्या सहाय्याने ७५ हजार पुस्तकांची १७ हजार चाैरस फूट भव्य शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे. या प्रतिमेचे वंडर बुक अॅाफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था आयाेजित शिव महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात केले आहे. संस्थेच्या प्रांगणात प्रतिमा पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करत आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते मिलिंद गुणाजी, एमकेसीएलचे सल्लागार विवेक सावंत, संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते तर प्रसंगी उपाध्यक्ष विश्र्वास मोरे, प्राचार्य एस आर देवणे, वंडर बुक रेकॉर्डच्या अमी छेडा व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी असलेले सावंत म्हणाले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ७५ हजार ज्ञानदीप घरोघरी आज पोहचणार आहेत. सुरतेच्या वखारीवर चढाई करताना महाराजांना इंग्रजांचा छापखाना घेवून यायचा होता. तो प्रयत्न यशस्वी झाला असता तर राज्यात ज्ञानक्रांती घडून आली असती. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी मुलांनी साकारलेले किल्ल्यांचे कौतूक करत असे प्रदर्शन दरवर्षी घेतले पाहिजे, असे सांगितले. ठाकरे यांनी समाजाला नवीन काय देता येईल, याचा विचार सुरू असताना शिवाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांना कळावी, या उद्देशाने वर्षभरापासून या महोत्सवासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू होते. विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याचे काम, भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भावी पिढीपर्यंत इतिहास पोहचावा याबद्दल माहिती देत त्यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. कुळवाडी भूषण पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रास्ताविक डॉ भास्कर ढोके यांनी तर प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

प्रदर्शनात विविध गाेष्टी

या शिव महोत्सवात कवड्यांची माळ, ६६ किल्ले, प्रसंगचित्रे, शिवकालीन मूळ नाणी, प्रतिकात्मक तलवार या सर्व गाेष्टी प्रदर्शनात मांडल्या आहेत. आजपासून ते १ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले असणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये साकारली ७५ हजार पुस्तकांची भव्य शिवप्रतिमा appeared first on पुढारी.