नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

उन्हाचे चटके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात नाशिकमध्ये उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३५.५ अंशावर पोहचला असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या झळांसोबत सामान्य घामाघूम होत आहेत.

मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम नाशिकमध्ये दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता नष्ट नाहीशी झाल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. सकाळी साडेदहानंतर उन्हाचा चटका बसायला सुरवात होत आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत उन्हाची सर्वाधिक तीव्रता जाणवते. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. रस्त्यांवर अघाेषित संचारबंदीसारखे वातावरण पाहायला मिळते आहे.

उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेयांची दुकाने व स्टॉल्स‌्वर गर्दी करताहेत. तसेच उन्हाच्या झळांपासून स्वत:ची सुरक्षा घेण्यासाठी नागरिक टोपी तर महिलावर्ग स्कार्फ व सनकाेटचा वापर करत आहेत. नाशिक शहराबरोबर मालेगावसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. सकाळी ऊन तापायच्या अगाेदर कामे उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दरम्यान, हवामान सध्या कोरडेठाक आहे. त्यातच वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात उन्हाच्या तडाखा वाढेल, असा अंदाज आहे.

The post नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम appeared first on पुढारी.