नाशिक : आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने अत्याचार, भोंदूला अटक

अटक,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने महिलेशी जबरस्तीने शरीरसंबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून घेत संशयित आरोपीस अटक केली आहे.

फिर्यादी ही बारा-तेरा वर्षांपासून आजारी असल्याने बऱ्याच दवाखान्यांत उपचार घेतले. परंतु काही फरक पडत नसल्याने शेवटी त्या उपचारांसाठी भोंदूकडे गेल्या. संशयित आरोपीचे नाव किशोर संजय लोखंडे (रा. टाकळी विंचूर, निफाड) असून, तो जादूटोणा व उतारे करून आजार बरे करण्याचे आश्वासन देत फिर्यादीच्या घरी जात होता. २९ मे रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास शिवनदीलगतच्या विहिरीजवळ आडोशाला जबरदस्तीने त्याने शरीरसंबंध केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच आरोपीने सोबत फोटो काढत सांगेल तसे न केल्यास फोटो नातेवाइकांना पाठवून बदनामीची धमकी देत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. शिवाय कोणाला काही सांगितल्यास नवऱ्याला जादूटोणा करून मारून टाकण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरासे व पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड करीत आहेत.

The post नाशिक : आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने अत्याचार, भोंदूला अटक appeared first on पुढारी.