नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा ‘इतका’ पाणीसाठा

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जून सरत आला असताना जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने आणखी काही दिवस पाठ फिरवल्यास जिल्ह्यावर पाणीटंचाईचे तीव्र संकट उभे ठाकेल.

मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झालेला असताना नाशिक व उत्तर महाराष्ट्राला त्याची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १४ हजार २५५ दलघफू इतका साठा शिल्लक आहे. नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चार प्रकल्पांत केवळ २१२२ दलघफू म्हणजेच २१ टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या दारणा समूहातील सहा प्रकल्पांमध्ये एकूण चार हजार ६२२ दलघफू साठा उपलब्ध असून, त्याचे प्रमाण २४ टक्के आहे.

पालखेड समूहातील धरणांमध्ये १०७६ दलघफू पाणी असून, हे प्रमाण १३ टक्के आहे. त्याचवेळी ओझरखेड समूहातील प्रकल्पांत ६०१ दलघफू म्हणजेच १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहातील पाच धरणांमध्ये एकत्रितरीत्या ५ हजार ३४४ दलघफू साठा उपलब्ध असून, त्याचे प्रमाण २३ टक्के आहे. तसेच पुनद समूहात दोन प्रकल्पांत ४४४ दलघफू (२७ टक्के) पाणी आहे. दरम्यान, गत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागांत मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. मात्र, अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसासाठी आता जिल्हावासीय देवाचा धावा करू लागले आहेत.

निम्म्या धरणांमध्ये १५ टक्के साठा

जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांपैकी निम्म्या धरणांमध्ये १५ टक्के व त्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही तिसगाव व माणिकपुंज हे दोन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आळंदीत केवळ एक टक्के पाणी आहे. वाघाड व भावलीत अवघा ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

धरणसाठा (दलघफूमध्ये)

समूह   साठा (दलघफू)     टक्के

गंगापूर     2122             21

दारणा      4622             24

पालखेड    1076             13

ओ‌झरखेड   601             19

चणकापूर   5344            23

पुनद         444             27

हेही वाचा :

The post नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.