नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा ‘बायपास’

ईलेक्ट्रीक बस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रिक बस निविदेची मुदत सोमवारी (दि. १२) संपुष्टात आल्यानंतर, कंपन्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पुढील १२ वर्षांसाठी इलेक्ट्रिक बसचे काम खासगी कंपनीद्वारे चालविले जाणार असून, त्याकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, या कंपन्यांबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे.

शहरात लवकरच ५० इलेक्ट्रिक बसेस येणार असून, पहिल्या टप्प्यात २५ बसेसची खरेदी केली जाणार आहे. मात्र, या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीकामी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने एप्रिल महिन्यापासून निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसादच न दिल्याने निविदेला तीनदा मुदतवाढ द्यावी लागली. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात दोन कंपन्यांनी यात सहभाग घेतल्याने, लवकरच याबाबतची तांत्रिकप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, नाशिक महानगर परिवहन महामंडळाने जुलै २०२१ पासून सिटीलिंक बससेवा सुरू केली असून, त्यात शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवासीसेवा पुरविली जात आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक बससेवेकरिता ५० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव केंद्राच्या फेम-२ योजनेंतर्गत केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला होता. महापालिकेने प्रतिइलेक्ट्रिक बस ५५ लाख रुपये अनुदान मिळ्णार आहे. एन कॅप योजनेतून वर्षाला २० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला हवाप्रदूषण कमी करण्यासाठी मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस खरेदीमुळे हवाप्रदूषण कमी होणार आहे. इलेक्ट्रिक बसेस आल्यानंतर त्यांची सर्व जबाबदारी, देखभाल दुरुस्ती, कर्मचारी याची जबाबदारी संबंधित कंपनीकडेच असणार आहे.

सोमवारी इलेक्ट्रिक बससाठीची अंतिम मुदत संपुष्टात आली. एप्रिलपासून राबविलेल्या या प्रक्रियेत दोन कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग

हेही वाचा :

The post नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा 'बायपास' appeared first on पुढारी.