नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा

सावकारी पाश www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुकान उघडण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याज घेणे एकास महागात पडले. दीड लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर सावकाराने युवकाकडून तीन वर्षांत ५ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, तरीदेखील सर्व रक्कम पुन्हा मागत सावकाराने कर्जदारास धमकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सावकाराविरोधात गुन्हा दाखल आहे.

रोहन यशवंत नहिरे (३२, रा. राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये हर्षल भडांगे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले. व्यवसाय सुरू करण्यासाठी रोहनने हे पैसे घेतल्यानंतर त्याने हर्षलला नियमितपणे व्याजासह पैसे परत केले. तरीदेखील हर्षलने रोहनला फोन करून मी दिलेली सर्व रक्कम लगेच परत कर, असे बोलून शिवीगाळ केली. तसेच धमकावत मानसिक त्रास दिला. दीड लाखांच्या कर्जापोटी ५ लाख २० हजार रुपये भरूनही हर्षल आणखीन पैशांची मागणी करत असल्याने व धमकावत असल्याने रोहनने इंदिरानगर पोलिसांकडे हर्षल विरोधात तक्रार केली आहे. हर्षलकडे खासगी सावकारी करण्याचा परवाना नसल्याचेही समोर येत आहे. त्यानुसार हर्षल विरोधात महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावकारांचे अधिकारी कनेक्शन?

मध्यंतरी सावकारी पाशात अडकलेल्या काहींनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कुंपणच शेत खातं असा प्रकार संबंधित खात्यात चालत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. त्यामुळे तक्रार तरी कोणाकडे करणार? आणि तक्रार केल्यानंतर कारवाई होण्याची खात्री नाही उलट सावकाराचा जाच जास्त वाढणार अशा भीतीने अनेकांनी तक्रार देणेच टाळले. त्याच कालावधीत तक्रार दाखल झालेल्या सावकारावरील कारवाई टाळण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना ताब्यात घेतले गेले. त्यामुळे सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्यांना यंत्रणेवरील विश्वास उडाला. त्यानंतर खासगी सावकारीने पुन्हा जोर पकडला असून, साहेबांचा वाटा वाढल्याने टक्केवारी वाढल्याचे ते खासगीत सांगत आहेत. आता यावर कडक कारवाई करायची असेल तर पीडित नागरिकांचा विश्वास आधी संपादन करावा लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कर्ज दिलं दीड लाख वसुल केले 5 लाख, सावकाराविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.