नाशिक : छठपूजेमुळे रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

रामकुंड www.pudhari.news

नाशिक : येत्या रविवार व सोमवारी छठपूजेसाठी पंचवटी, रामकुंड व गंगाघाट परिसरात शहरातील विविध भागांतून उत्तर भारतीय भाविक येणार असल्याने रामकुंड व गंगाघाट परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रामकुंड परिसरातील रस्ते अरुंद असल्याने या मार्गावर वाहनांची ये-जा सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरून येणारी वाहने अन्यत्र वळविण्यात येणार आहेत.

रविवारी व सोमवारी (दि.१९ व २०) मालेगाव स्टॅण्ड सिग्नलकडून रामकुंडाकडे येणारा रस्ता, सार्वजनिक वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, दिल्ली दरवाजा, गणेशवाडी या भागातून रामकुंडाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने गणेशवाडी, काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबतचा सूचना संबंधितांना दिल्या असून, सर्वांनी बदललेल्या वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : छठपूजेमुळे रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.