नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

नाशिक जिल्हा परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ६२ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकूण ७० वारसांना बोलावण्यात आले होते. तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अर्हतेनुसार गट क संवर्गात समायोजनासाठी पात्र असणाऱ्या ३ गट ड कर्मचारी यांचे गट क संवर्गातील पदांवर समायोजन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत १० अनुकंपाधारक वारसांनी नियुक्तीस नकार दिला. त्यानुसार एकूण ६२ वारसांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण धनंजय कोळी हे उपस्थित होते.

संपूर्ण प्रक्रियेत रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहायक शीतल शिंदे, सरला सोनार, ज्योती गांगुर्डे, वरिष्ठ सहायक भास्कर कुंवर, कानिफनाथ फडोळ, राहुल देवरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बागड, सोनाली भार्गवे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे यांनी परिश्रम घेतले.

सामान्य प्रशासन परिचर : २८,
आरोग्य विभाग आरोग्यसेवक : १४
इमारत व दळणवळण कनिष्ठ अभियंता : ३
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : ६
महिला व बालविकास अंगणवाडी पर्यवेक्षिका : १
कृषी विभाग विस्तार अधिकारी कृषी : १
पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक : १
अर्थ विभाग वरिष्ठ सहायक लेखा : १
कनिष्ठ सहायक लेखा : ३
शिक्षण विभाग शिक्षणसेवक : १
ग्रामपंचायत विभाग कंत्राटी ग्रामसेवक : ३
एकूण ६२

अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करते व प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्याबाबद्दल त्यांना शुभेच्छा देते. पुढील काळात शासकीय कर्मचारी यांनी शासन नियमांचे पालन करत उत्कृष्ट कामकाज करून ग्रामीण भागातील जनतेस सेवा उपलब्ध करून द्याव्यात. – आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

The post नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन appeared first on पुढारी.