नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा 

नोकरीचे आमिष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नातलगांना नोकरी लावून देतो, गुंतवणुकीवर आकर्षक परतावा असे आमिष दाखवून 2 कोटी ७६ लाख रुपये घेत गंडा घातल्या प्रकरणी एकाविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित सुशील भालचंद्र पाटील (३५, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) याला अटक केली आहे.

अनिला अशोक आव्हाड (रा. लॅमरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधीत संशयित सुशीलने गंडा घातला. सुशीलने अनिला यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या नातलगांना नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले होते. सुशील बोलण्यात तरबेज असल्याने तो विविध शासकीय योजना, आर्थिक परतावा देण्याच्या योजना सांगत अनिला यांना गुंतवणुकीस प्रोत्साहित करीत होता. अनिला यांच्या बहिणीला अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशीलने अनिला यांच्याकडून लाखो रुपये घेतले. बहिणीचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून ते अनिला यांना दाखवले व हे नियुक्तिपत्र बहिणीच्या पत्त्यावर येईल असे सांगितले. मात्र नियुक्तिपत्र आलेच नाही. अनिला यांच्या नातलगांकडून कोट्यवधी रुपये घेत सुशीलने त्यांना अपेक्षित परतावा किंवा नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिला यांनी देवळाली कॅम्प पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. न्यायालयाने सुशीलला सोमवार (दि. १०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलविरोधात गत महिन्यात चाळीसगाव पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातही सुशीलने १ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुशीलने इतरही गुंतवणूकदार, नागरिकांची फसवणूक केल्याचा शक्यता पोलिस वर्तवत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा  appeared first on पुढारी.