नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

जन्मठेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करीत मुलीवरही हल्ला करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी तुकाराम माळी (३२, रा. जाखोरी) असे या आरोपीचे नाव आहे. शिवाजी माळी याने १३ जून २०२० रोजी रात्री पत्नी ज्योती उर्फ मिना शिवाजी माळी (२७) हिचा खून केला होता.

शिवाजी माळी हा पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. १३ जून २०२० रोजी रात्री त्याचे पत्नी ज्योतीसोबत वाद झाले होते. वादात ‘मी पळून जाईल’ असे ज्योतीने सांगितल्याने संतापाच्या भरात आरोपीने कोयत्याने ज्योतीच्या गळ्यावर वार केला होता. त्याचवेळी मुलगी रोहिनी शिवाजी माळी (११) ही आईला वाचवण्यासाठी आली असता आरोपीने रोहिनीवरही हल्ला केला. त्यात रोहिनीच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शिवाजी माळी विरोधात खुन, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. भालेराव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यानुसार न्यायाधीश आर. आर. राठी यांनी आरोपीस खुनप्रकरणी जन्मठेप व ३० हजार रुपयांचा दंड आणि मुलीस मारहाण केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.