नाशिक : पोलिसांच्या दंडुक्याने हॉटेलमधील ‘बैठका’ गूल, मद्यपींनी बदलले अड्डे

दारुपार्टी ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांविरोधात कठोर अंमलबजावणीस सुरुवात केल्याने हॉटेलमधील अवैध मद्यविक्री, पार्सल पॉइंट, हुक्का पार्लर बंद होऊन मद्यपींनाही रोजचे बसण्याचे ठिकाण बदलावे लागत आहे. ओल्या बैठकांसाठी हॉटेलची शोधाशोध करूनही मिळत नसल्याने नाईलाजाने मद्यपी परमिट रूम, बारमध्ये किंवा निर्जन स्थळी किंवा वाहनातच मद्यसेवन करताना आढळत आहेत.

पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या खांदेपालटानंतर कामकाजाचे स्वरूपही बदलले. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेनुसार ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. पोलिस ठाणेनिहाय कारवाईच्या धडाक्याने अवैध धंद्यांवर जरब बसली. त्यातच वरिष्ठ पोलिसांचे पथकही स्वतंत्ररीत्या कारवाई करत असल्याने स्थानिक पोलिसांवर अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या दबाव आहे. ग्रामीण भागात हाॅटेल्समध्ये हुक्का पार्लर, बेकायदेशीररीत्या मद्यविक्री व मद्यसेवनाचे बेकायदेशीर व्यवस्थेचे जाळे उभे राहिले होते. मात्र, ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहे. गुन्हे दाखल होत असल्याने अनेकांनी हुक्का पार्लर, मद्यपींना बसण्यास परवानगी नाकारत फक्त जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पण, काहींना ग्राहकांअभावी हॉटेलच बंद ठेवावे लागत आहेत. शहरालगतच्या चांदशी, दरी मातोरी, गिरणारे, गंगापूर, औरंगाबाद रोड, पेठ महामार्गासह इतर तालुक्यांमधील अनेक हॉटेल बंद पडली आहेत किंवा फक्त खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. त्यांच्याकडे येणारा विशिष्ट ग्राहक वर्ग दिसेनासा झाला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे मद्यपींचा त्रास कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हॉटेलचालकांना उत्पन्नाचे साधन वाढवण्यासाठी पर्यायांचा विचार करावा लागत आहे.

ट्रकचालकांचे जेवणाचे वांधे

रात्री१० नंतर ग्रामीण भागातील हाॅटेल बंद हाेत आहेत. महामार्गावरील हॉटेलही बंद होत असल्याने त्याचा फटका रात्री प्रवास करणाऱ्या ट्रकचालकांना बसत आहे. नाशिकला जेवणाचे बेत आखणाऱ्या ट्रकचालकांना महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स बंद दिसत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यात जेवणासाठी जावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ट्रकचालकांची उपासमार होत असल्याचे बोलले जाते.

शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात अनेकांनी शेतात हॉटेल उभारले. मद्यपी व खवय्यांना आकर्षित करण्यासाठी रोषणाई, राहुट्या, फर्निचर उभे केले. मात्र, ग्रामीण पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे मद्यपींना बसण्याची व्यवस्था करता येत नाही. ग्राहकही बैठकीची मजा जायला नको म्हणून परमिट रूम किंवा इतरत्रच बैठका रंगवताना दिसत आहेत. त्यामुळे हाॅटेलचालकांना पोलिस कारवाईमुळे आर्थिक फटका बसत आहे.

धरणालगतच्या हॉटेल्सवर कृपादृष्टी

ग्रामीण भागातील हॉटेलवरील कारवाई सुरू असली तरी काही ठिकाणच्या हॉटेलवर स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी असल्याचे दिसते. त्र्यंबकेश्वर, अंबोली, पहिनेसह जिल्ह्यातील धरणांलगत असलेल्या हॉटेलमध्ये मद्यपींना बसण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई का होत नाही याचेही कोडे उलगडलेले नाही.

हेही वाचा : 

 

The post नाशिक : पोलिसांच्या दंडुक्याने हॉटेलमधील 'बैठका' गूल, मद्यपींनी बदलले अड्डे appeared first on पुढारी.