नाशिक : मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा; बाजार समिती निवडणुकीत माघारीच्या दिवशी कार्यकर्ते भिडले

मनमाड,www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

मनमाड बाजार समिती निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 20) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांच्या समोरच ही घटना घडली. सुमारे अर्धा तास हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

याबाबत दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनमाड बाजार समिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. गुरुवारी (दि. 20) उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. एकूण 18 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना, भाजप युती अशी लढत होत आहे. युतीचे नेतृत्व आमदार सुहास कांदे, साईनाथ गिडगे, डॉ. संजय सांगळे, प्रकश घुगे करीत आहेत, तर महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी आमदार संजय पवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, दीपक गोगड करीत आहेत. त्यासाठी 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली होती. दुपारी 1 च्या सुमारास एका उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून दोन्ही गटांत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद होऊन हमरीतुमरी आणि मारामारी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.

हा प्रकार वाढतच असल्याने दोन्ही गटांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली, तर पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पांगविल्याने परिस्थिती निंत्रणात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस कुमक वाढविली. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा :

The post नाशिक : मनमाडला ठाकरे-शिंदे गटांत राडा; बाजार समिती निवडणुकीत माघारीच्या दिवशी कार्यकर्ते भिडले appeared first on पुढारी.