नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

विषबाधा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली येथील आदिवासी कुटुंबाने रानभाजी खाल्ल्याने नऊ सदस्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मंगळवारी सकाळी न्याहारी करताना पारधी कुटुंबातील महिलेने रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले भुईफोड या भूछत्राची भाजी तयार केली. ती भाजी खाणारे सर्व व्यक्तींना अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळणे तसेच डोळे लाल होणे असा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने त्र्यंबकेश्वर येथे खासगी दवाखान्यात आणले असता सर्वांची तब्येत अधिक खालावली. काहींना उलट्या सुरू झाल्या. त्या सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप अडके यांनी तातडीने उपचार सुरू केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत लोंढे आणि सर्व कर्मचारी यांनी सर्व रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्यावर काही तास लक्ष ठेवले. त्यामुळे सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले.

याबाबत सोनाबाई पारधी यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री रानातून भुईफोड म्हणजेच भूछत्र ही रानभाजी आणली होती. मंगळवारी सकाळी ती भाजी तयार करण्यात आली. पारधी कुटुंबातील आणि शेजारचे बांगारे कुटुंबातील अशा एकूण 9 व्यक्तींनी ती खाल्ली व त्रास सुरू झाला. घरातील लहान मुलांनी भाजी खाल्ली नाही अन्यथा अत्यंत बिकट प्रसंग ओढावला असता.

त्र्यंबकेश्वर येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित व्यक्तींत सुनीता बुधा बांगारे (वय 27) , करण रामदास पारधी (वय 22), सागर रामदास बांगारे (वय 17), सोमनाथ काळू पारधी (वय 25), शांताबाई रामदास पारधी (वय 40), सोनाबाई देवराम पारधी (55), गोदाबाई धोंडू पारधी (60), बुधा काळू बांगारे (30) यांचा समावेश असून, वनिता अशोक पारधी (20) या महिलेला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

काळजी आवश्यक

पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्या खाल्ल्यास आरोग्यास फायदा होत असतो. आदिवासींच्या जीवनशैलीचा तो एक अविभाज्य भाग आहे. मात्र, त्यापैकी काही विषारी असू शकतात. याची काळजी घेतली नाही तर प्रसंगी जिवावर बेतू शकते.

हेही वाचा : 

The post नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा appeared first on पुढारी.