नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

samso www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वीच एबीबी कंपनीने सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तार केल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. आता सॅमसोनाइटनेही गोंदे येथे तब्बल 200 कोटींची गुंतवणूक करून आपला प्रकल्प विस्तार केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि ट्रॅव्हल लगेज उत्पादक सॅमसोनाइट साउथ लगेज उत्पादक सॅमसोनाइट साउथ एशिया या कंपनीने दुसर्‍या टप्प्यात प्रकल्पविस्तार केला आहे. मुंबई – आग्रा महामार्गावर गोंदे येथे सॅमसोनाइट कंपनीचा प्रकल्प आहे. कंपनीला भारतासह दक्षिण आशियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने येथील प्रकल्प विस्तार करण्याचा विचार केला. याबाबत कामगार युनियनबरोबर नुकताच करार झाला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यापूर्वीच कामगारांना तशी कल्पना दिली होती. मात्र, अधिकृत घोषणा बाकी होती. सद्यस्थितीत कंपनीच्या प्रकल्पातून वर्षाकाठी पाच लाख बॅगा तयार होतात. विस्तारानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस ही क्षमता 7.5 लाख होईल. त्यापुढील वर्षाच्या अखेरीस हीच क्षमता थेट 10 लाख एवढी होणार आहे. यासाठी नवीन कारखान्यांसाठी इतर राज्यांच्या व्यवहार्यतेचा शोध घेतला जाईल. सॅमसोनाइट कंपनीने अलीकडेच बिहारमधील दरभंगा येथे एक किरकोळ आउटलेट उघडले आहे. तसेच बिहारमध्ये कटिहार आणि मुझफ्फरपूर येथे स्टोअर लाँच करण्याची योजना आहे. याद्वारे कंपनीच्या मालकीच्या स्टोअरची संख्या 65 पर्यंत जाईल. दरम्यान, कंपनीच्या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

स्वयंचलित गोदामांसाठी 50 कोटी
विस्ताराचा भाग म्हणून एक लाख 80 हजार चौरस फूट एवढे बांधकाम करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. हे बांधकाम या वर्षाच्या अखेरीस सुरु होण्याची अपेक्षा आहे. हार्ड लगेज उत्पादन क्षमतेसाठी 125 ते 150 कोटींची गुंतवणूक केली जाईल. स्वयंचलित गोदामांसाठी 50 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. रिटेल स्टोअर्सचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. ट्रॅव्हल लगेज उद्योग पुढील 10 वर्षात एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कंपनी नियोजन करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार appeared first on पुढारी.