पशुधन कसं वाचवायचे? चाराटंचाईमध्ये पशुपालकांपुढे प्रश्न

चारा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे सिन्नर, चांदवड व नांदगाव या तालुक्यांमधील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अडीच महिने म्हणजेच १५ जूनपर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक असून सिन्नर, चांदवड व नांदगाव या तालुक्यांमध्ये दोन महिने पुरेल इतका खरीप व रब्बी हंगामातील चारा आहे, असे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षाही कमी राहिले. त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम कसाबसा निघाला. रब्बी हंगामात मात्र शेतीला पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे लागवडीखालील पिकाचे क्षेत्रही घटले. अशा परिस्थितीत जिल्ह्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता काही तालुक्यांमध्ये आहे. मात्र, जिल्ह्यात अडीच महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले. सिन्नर, चांदवड व नांदगाव तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे खरीप व रब्बी हंगामाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे चाऱ्याचे उत्पादनही अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे.

कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात चाऱ्याचे सरासरीपेक्षा कमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या ज्या भागात जी लहान-मोठी धरणे, बंधारे, लघुपाटबंधारे आहेत त्यांच्या गाळपेरा क्षेत्रामध्ये चारा बियाणे पेरणी करण्याबाबतच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. या गाळपेऱ्यामध्ये साधारण दोन हजार हेक्टरवर दोन लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होऊ शकतो, अशी शक्यता पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. या गाळपेऱ्यामध्ये पाळीव पशूंसाठी चारा तयार करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक व पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ऑनलाइन बैठकीत सूचना केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महिन्याला लागतो इतका चारा
जिल्ह्यात १९ लाख ८६ हजार ३०७ इतके पशुधन आहे. त्यांना एक महिन्याकरिता दोन लाख ५९ हजार मेट्रिक टन इतका चारा लागतो. जिल्ह्यात सात लाख, पंधरा हजार मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध असून, तो आगामी दोन ते अडीच महिने पुरेल इतकाच साठा आहे.

हेही वाचा:

The post पशुधन कसं वाचवायचे? चाराटंचाईमध्ये पशुपालकांपुढे प्रश्न appeared first on पुढारी.