पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिकाविरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी लवकर घेण्यासाेबत कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ग्राहक मंचातील अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली.

अभिलेखाकार संशयित धीरज मनोहर पाटील (४३) आणि शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (५७) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार यांनी सिडकोतील सावता नगर परिसरात फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकास तीन लाख ७० हजार रुपये दिले. मात्र व्यावसायिकाने तक्रारदाराच्या नावे परस्पर कर्ज काढून ते पैसे स्वत:कडे ठेवले. त्यामुळे तक्रारदाराने ग्राहक मंचात दावा केला होता. या प्रकरणाची सुनावणी लवकर करण्यासोबतच कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात धीरजने तक्रारदाराकडे ५०० रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार विभागाने सापळा रचून संशयित पाटील यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर संशयित भोये याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे उघड झाले. त्यामुळे विभागाने दोघांना पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा –

The post पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात appeared first on पुढारी.