हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

गोडसे प्रचार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरू असताना, रविवारी (दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. खा. गोडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला मनसेतूनच सुरुवात झाली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारपत्रकावरील राज ठाकरेंच्या फोटोमुळे गोडसेंचे मनसेसमवेतच्या नात्याचे वर्तूळ पूर्ण झाले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून प्रचाराला सुरुवातदेखील झाली आहे, तर दुसरीकडे महायुतीत मात्र नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपनेदेखील दावा केला आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी मोठा जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळदेखील नाशिकमधून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यातच भाजपच्या दाव्यामुळे महायुतीतील संघर्ष वाढला आहे.

उमेदवारीसाठी खासदार गोडसे हे सातत्याने ठाणेवारी करत आहेत. रविवारी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय शब्द दिला, हे समजू शकले नाही. परंतु, या भेटीनंतर गोडसे यांनी पुन्हा जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारपत्रके वाटली जात असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले या महायुतीच्या नेत्यांबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचादेखील फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मनसे उमेदवार ते मनसेचा पाठिंबा
खासदार हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असले, तरी ते पूर्वाश्रमीचे मनसेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात मनसेतूनच झाली आहे. २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहरी राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी ‘मनसे’तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून गोडसेंनी ठाकरेंचा फोटो प्रचारपत्रकावर प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचा:

The post हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले 'राज' appeared first on पुढारी.