पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील 25 जणांना दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात 17, काहींवर खासगी रुग्णालयात, तर काही रुग्णांवर घोटी येथे उपचार सुरू आहेत. याच तालुक्यातील तारांगण पाडा येथे दोन आठवड्यांपूर्वी नागरिकांना त्रास झाला होता. त्यात एकाचा मृत्यूदेखील झाला. येथील पाण्याचे नमुने तपासले असता, ते पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आला होता, तरीदेखील हा त्रास कशामुळे होत आहे, याचे कारण शोधण्यास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावात भेट देऊन नागरिकांना मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी या ठिकाणी भेट देऊन रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन केले. दोन आठवड्यांपूर्वी तारांगण पाडा येथील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा त्रास झाल्याची घटना ताजी असतानाच फांगुळगव्हाण गावातील लोकांना जुलाब व उलट्यांचा त्रास झाला आहे. आरोग्य विभागाने त्यांना शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. परंतु, सातत्याने घडणार्‍या घटनांमुळे तालुक्यात भीती पसरली आहे.

अनेकदा ग्रामपंचायतींकडून वापरल्या जाणार्‍या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे पाणी स्वच्छ होत असून, ते ग्रामस्थांना पिण्यायोग्य होते. मात्र, फांगुळगव्हाण येथे पिण्याच्या पाण्यात पावडरचे प्रमाण जास्त झाल्यामुळेच उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासक यांच्या कारभारामुळे गावातील ग्रामस्थांची मानसिक व शारीरिक तसेच आर्थिक हानी होत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा appeared first on पुढारी.