बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा

स्पा सेंटर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पाथर्डी रोडवरील कर्मा क्रिस्टल संकुल येथे सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उघड करीत संशयितांची धरपकड केली. इंदिरानगर पोलिसांच्या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेसह इतर चौघांना ताब्यात घेतले आहे. एक संशयित पसार आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयेशा कादरी (रा. पाथर्डी फाटा), विजयकुमार नायर (४३, रा. दामोदरनगर), सुलेमान अन्सारी (रा. पाथर्डी गाव), अजय चव्हाण (रा. दामोदरनगर), रवी मुठाळ (रा. लहवित) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत, तर मुख्य संशयित शुभम चव्हाण हा फरार आहे. पोलीस अंमलदार सागर परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, पाथर्डी रोडवर स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय चालतो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून माहितीची खात्री केली. पोलिसांना खात्री झाल्यानंतर पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. त्याठिकाणी संशयित आयेशा हिच्यासह चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. स्पा सेंटरमध्ये दोन पीडित महिला आढळून आल्या. याठिकाणी पार्टीशन टाकून दोन खोल्या करण्यात आल्या होत्या. पीडित महिलांना मसाजच्या कामासाठी आणून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितांची सुटका करीत त्यांना वात्सल्य आश्रमात पाठविण्यात आले आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहायक निरीक्षक निखिल बोंडे, संदीप पवार, महिला उपनिरीक्षक बारेला यांच्यासह जावेद खान, मुशरीफ शेख, चंद्रभान पाटील, धनवंता राऊत आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post बनावट गिऱ्हाईक पाठवून स्पा सेंटरमध्ये छापा appeared first on पुढारी.