भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

भीमजयंती pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणूक… अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.१४) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या नाशिकमधील तेजाळे चौकातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आंबेडकरी अनुयायांचा जनसागर रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांनी नाशिककरांचे लक्ष वेधले.

शहरातील मोठा राजवाडा येथून शहरातील मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी राजकीय मंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध संकल्पनांवर आधारलेले १७ चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘जय भीम’चा उल्लेख असणारे टी-शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांचा मिरवणुकीतील उत्साह बघण्यासारखा होता. डीजेच्या तालावर थिरकत मिरवणूक पुढे पुढे येत गेली. वाकडी बारव, दूधबाजार, राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, नेहरू गार्डन, शालिमार या मार्गे अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचली. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न यांनीदेखील सहभागी होत समाजबांधवांना मार्गदर्शन केले. निळे फेटे बांधलेल्या महिलांनीदेखील भीमगीतांवर ठेका धरल्याचे दिसून आले. जागोजागी फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीचा जल्लोष आणखीनच वाढत गेला. याप्रसंगी जागोजागी कमानी, स्वागतफलक लावण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान विविध पक्ष, संघटनांकडून सरबत, पाणी, चहा, अन्नदान वाटप करण्यात आले. भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले होते.

विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेल्या चित्ररथांनी लक्ष वेधून घेतले.

राजकारण्यांची गर्दी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मिरवणुकीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात राजकारणी मंडळी सहभागी होत असतात. यंदा लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत असल्याने, इतर वर्षांच्या तुलनेत मोठ्या संख्येने राजकारणी सहभागी झाले होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याबरोबरच शहरातील विविध मंडळांना भेटी देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मिरवणुकीत त्यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, माजी आ. वसंत गिते, माजी महापौर अशोक दिवे, विनायक पांडे, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, आनंद सोनवणे, संजय साबळे, विलास शिंदे, कविता कर्डक, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर आदी सहभागी झाले होते.

चित्ररथातून जनजागृती
मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथ देखाव्यात विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच डॉ. आंबेडकरांनी देशहितासाठी केलेली कामे उदा. जलनीती, नदीजोड प्रकल्प, बांधलेले धरणे, वीज महामंडळ, रिझर्व्ह बँक, शेती, जमीनविषयक विचार, स्त्रीभ्रूण हत्या, सामाजिक प्रश्न, राजकीय भाष्य, डॉ. आंबेडकरांविषयी विविध विषय तसेच त्यांच्या जीवनावरील विषय या चित्ररथातून मांडण्यात आले होते.

हेही वाचा:

The post भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.